नाशिक : अतिक्रमण काढण्यासाठी गेलेल्या वनरक्षक महिलेसह वन मजुराला मारहाण

वनरक्षक महिलेसह वन मजुराला मारहाण,www.pudhari.news

सिन्नर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

वनविभागाच्या राखीव जमिनीवरील अनधिकृत झोपड्या काढण्यासाठी गेलेल्या महिला वनरक्षकासह वनमजुराला आठ ते दहा जणांनी दमदाटी शिवीगाळ करीत जबर मारहाण केली. सिन्नर तालुक्यातील मेंढी शिवारात रविवारी (दि. 23) सकाळी अकरा ते साडे अकराच्या सुमारास ही घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

वनरक्षक वत्सला तुकाराम कांगणे व वनमजूर मधुकर शिंदे अशी मारहाण झालेल्या वन कर्मचाऱ्यांची नावे असून त्यांच्यावर सिन्नर येथील ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, सिन्नर तालुक्यातील मेंढी शिवारात काही आदिवासींनी वनविभागाच्या राखीव जमिनीवर अतिक्रमण करून झोपड्या बांधल्या आहेत. हे अतिक्रमण काढण्यासाठी वनरक्षक कांगणे व वनमजूर शिंदे मेंढी शिवारात गेले होते. झोपड्या तोडण्यासाठी कांगणे यांनी कोयता हातात घेतला होता. आदिवासी लोक येण्यापूर्वी दोन झोपड्याचे अतिक्रमण काढण्यात आले. मात्र आदिवासींना हे कळाल्यानंतर त्यांनी या ठिकाणी धाव घेऊन वनविभागाला अतिक्रमण काढण्यास विरोध केला. झोपडी काढण्यासाठी जात असताना झटापटीत वनरक्षक कांगणे यांच्या हातातील कोयता एका महिलेच्या डोक्याला लागला.

त्यामुळे अधिकच संतप्त झालेल्या आठ ते दहा जणांनी वत्सला कांगणे व वनमजूर शिंदे यांना शिवीगाळ दमदाटी करीत जबर मारहाण केली. त्यात कांगणे जखमी झाल्या असून त्यांच्यावर सिन्नर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

दरम्यान या प्रकरणी महिला वनरक्षक कांगणे यांच्या फिर्यादीवरून मिराबाई सोमनाथ मोरे, दगूबाई अर्जुन पवार, जनाबाई कुवर, मनीषा भवर, दीपक अर्जुन पवार, संदीप भोई, (सर्व रा. मेंढी ता. सिन्नरो) अशा सहा जणांविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी तसेच गैर कायद्याची मंडळी जमवून वन कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक शाम निकम यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब लोंढे पुढील तपास करीत आहेत.

हेही वाचा :

The post नाशिक : अतिक्रमण काढण्यासाठी गेलेल्या वनरक्षक महिलेसह वन मजुराला मारहाण appeared first on पुढारी.