नाशिक : अनधिकृत बांधकाम, अतिक्रमण झाल्यास अधिकारी राहणार जबाबदार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शहरात कोठेही अतिक्रमण होणार नाही तसेच अधिकार्‍यांना नेमून दिलेल्या कार्यक्षेत्रात कोणत्याही प्रकारचे अनधिकृत बांधकाम झाल्यास त्याला संबंधित अधिकारी तसेच विभागीय अधिकारी जबाबदार असतील, अशा स्वरूपाचा इशाराच आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी खातेप्रमुखांच्या बैठकीत दिला आहे.

शहरात अनेक ठिकाणी अतिक्रमण झाल्याचे निदर्शनास येत आहे. तसेच अनधिकृत बांधकाम आणि जागेच्या वापरातील बदलही अनेक ठिकाणी झाल्याचे दिसून येत आहे. असे असताना संबंधित अधिकारी, अभियंते व विभागीय अधिकार्‍यांकडून त्याची दखल घेतली जात नाही. त्यामुळे अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकामांमुळे शहराला बकाल स्वरूप येत आहे. त्या अनुषंगाने आयुक्तांनी खातेप्रमुखांच्या बैठकीत अतिक्रमण व अनधिकृत बांधकामांविषयी आढावा घेतला. संबंधित विभागीय अधिकार्‍यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात कोठेही अतिक्रमण होणार नाही याची दक्षता घेण्याची सूचना त्यांनी केली. सर्व विभागीय अधिकार्‍यांनी दररोज किमान एकदा आपापल्या कार्यक्षेत्रात फेरी मारून पाहणी करावी. नवीन अतिक्रमण झाल्याचे आढळल्यास संबंधित विभागीय अधिकार्‍यास जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई प्रस्तावित करण्याचा इशारा आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांनी दिला. यावेळी आयुक्तांनी ईदगाह मैदानावर झालेल्या अतिक्रमणाचा मुद्दा उपस्थित करत संबंधित विभागीय अधिकार्‍यांनी नियमानुसार तत्काळ कारवाई करण्याची सूचना आयुक्तांनी केली.
नगररचना विभागाचे अधिकारी व अभियंत्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात कोणत्याही प्रकारचे अनधिकृत बांधकाम होणार नाही याची दक्षता घ्यावी अन्यथा अशा अधिकार्‍यांविरुद्ध महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियमाच्या कलमानुसार कारवाई करण्याचा इशारा आयुक्तांनी अधिकार्‍यांना दिला आहे.

बायोमेट्रिक हजेरी आवश्यक
मनपा मुख्यालय, सर्व विभागीय कार्यालये, उपकार्यालये व इतर विभागांच्या कार्यालयांत कार्यरत कर्मचार्‍यांची दैनंदिन बायोमेट्रिक हजेरी आवश्यक असल्याची सूचना आयुक्तांनी केली. त्यानुसार सर्व विभागप्रमुख आणि कार्यालयप्रमुखांनी 100 टक्के कर्मचार्‍यांची बायोमेट्रिक हजेरी नोंदविली जात आहे की नाही, याची खात्री करूनच वेतन बिले तयार करावी, अशी सूचनाही आयुक्तांनी खातेप्रमुखांना केली आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : अनधिकृत बांधकाम, अतिक्रमण झाल्यास अधिकारी राहणार जबाबदार appeared first on पुढारी.