Site icon

नाशिक : अनिवासी दाम्पत्यासह तिघांविरोधात बंगला हडपल्याबद्दल गुन्हा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

आईचे खोटे मृत्युपत्र बनवून त्या आधारे मालमत्ता हडपण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तसेच बंगल्यावर बेकायदेशीर ताबा मिळवून मूळ मालकास बंगल्याचा उपभोग घेण्यापासून मज्जाव करणाऱ्या अनिवासी भारतीय दाम्पत्यासह मुंबईतील एकाविरोधात न्यायालयाच्या आदेशानुसार देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

रवींद्र मेघराज कनाल (रा. देवळाली कॅम्प) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, संशयित शशांक विनोद झंवर, प्रियंका शशांक झंवर (दोघे रा. अमेरिका) व सुधा कनाल ढाटिया (रा. मुंबई) यांनी संगनमत करून मालमत्ता बळकावत त्रास दिला. रवींद्र यांच्या मालकीचा मेघ मल्हार हा बंगला संशयितांनी बनावट मृत्युपत्राद्वारे हडपण्याचा प्रयत्न केला. तसेच बंगल्यात रवींद्र यांना व त्यांच्या कुटुंबीयांना येण्यासासून रोखले. रवींद्र यांच्या आईचे दागिने, चीजवस्तू घेतल्या. त्याचप्रमाणे रवींद्र यांच्या कुटुंबीयांना त्रास देण्याच्या उद्देशाने संशयितांनी खोटे गुन्हे दाखल करण्याचाही कट रचला. त्यामुळे रवींद्र यांनी सुरुवातीस देवळाली कॅम्प पोलिसांकडे तक्रार केली, मात्र पोलिसांनी तक्रारीची दखल न घेतल्याने रवींद्र कनाल यांनी न्यायालयात धाव घेतली. रवींद्र कनाल यांच्या वतीने ॲड. उमेश वालझाडे, ॲड. योगेश कुलकर्णी, ॲड. प्रशांत देवरे यांनी युक्तिवाद केला. रवींद्र यांच्या तक्रारीची दखल घेत न्यायालयाने देवळाली कॅम्प पोलिसांना तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.

हेही वाचा : 

The post नाशिक : अनिवासी दाम्पत्यासह तिघांविरोधात बंगला हडपल्याबद्दल गुन्हा appeared first on पुढारी.

Exit mobile version