नाशिक : अनैतिक संबंधांच्या संशयावरुन युवकावर प्राणघातक हल्ला

हल्ला www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याच्या रागातून एकाने नातलगासह मिळून युवकावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना आगरटाकळी परिसरात घडली. या हल्ल्यात इरफान हुबे शेख (24, रा. नारायण बापूनगर, उपनगर, मूळ रा. उत्तर प्रदेश) हा युवक जखमी झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतले आहे.

उपनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इरफान शेख याचे घराजवळ राहणार्‍या एका महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याची शंका संशयित कालुराम ऊर्फ कैलास गंगाराम मीना (रा. लोखंडे मळा, मूळ रा. राजस्थान) याला आली. त्यामुळे त्याने याची माहिती नातलग रामलाल राया मीना (30, रा. लोखंडे मळा, मूळ रा. राजस्थान) यास सांगितली. त्यानंतर दोघांनी संगनमत करून टाकळी रोडवरील पंपिंग स्टेशनजवळील शेतात इरफान शेख यास रविवारी (दि.3) रात्री गाठले. तेथे दोघांनी मिळून धारदार शस्त्राने इरफानच्या गळ्यावर वार करून दोघे फरार झाले. जखमी इरफान यास जिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर त्यास आडगाव येथील वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपआयुक्त विजय खरात, सहायक आयुक्त सिद्धेश्वर धुमाळ, वरिष्ठ पोलिस निरीक्षक नीलेश माईनकर हे घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळावरून संशयितांची आरजे 09 एसएक्स 3992 क्रमांकाची दुचाकी मिळून आली. त्यावरून तपास केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

या प्रकरणी उपनगर पोलिसांनी संशयितासह तिघांना ताब्यात घेतले असून, उपनगर पोलिस ठाण्यात इरफानच्या भावाच्या फिर्यादीवरून संशयितांविरोधात जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

हेही वाचा :

The post नाशिक : अनैतिक संबंधांच्या संशयावरुन युवकावर प्राणघातक हल्ला appeared first on पुढारी.