नाशिक : अनैतिक संबंधात अडसर, डॉक्टर पतीला भुलीचे इंजेक्शन देत खुनाचा प्रयत्न

injection,www.pudhari.news

नाशिक, पंचवटी :  पुढारी वृत्तसेवा
पत्नीचे अनैतिक संबंध डॉक्टर पतीला समजताच त्याने तिला व तिच्या प्रियकराला विचारणा करून वाद घातला. त्यानंतर पत्नीचा पारा चढल्याने तिने हॉस्पिटलमध्येच डॉक्टर पतीला भुलीचे इंजेक्शन देत ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना म्हसरूळ परिसरात घडली. या प्रकरणी दुसर्‍या पत्नीसह तिच्या प्रियकराविरुद्ध म्हसरूळ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

म्हसरूळ परिसरात 55 वर्षीय पीडित डॉक्टरचे स्वत:चे खासगी रुग्णालय आहे. या रुग्णालयात संशयित पत्नी आणि तिचा प्रियकर यांचे डॉक्टरांसोबत दोघांचे वाद झाले. यानंतर प्रियकर निघून गेला, तर पत्नी डॉक्टरांसमवेत रुग्णालयातील विश्रांती कक्षात गेली. तिथे डॉक्टरांना तिने भुलीचे इंजेक्शन देत ठार करण्याचा प्रयत्न केला. ही बाब डॉक्टरांनी पहिल्या पत्नीच्या मुलाला सांगितल्यावर त्याने पोलिसांना माहिती दिली. त्याच्या फिर्यादीवरून डॉक्टरच्या पत्नीसह प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दुसर्‍या पत्नीचे नात्यातीलच एकाशी अनैतिक संबंध असल्याचे डॉक्टरला कळले. त्यातून हा वाद झाल्याची माहिती समोर आली आहे.

‘कोरोना’मुळे पुन्हा आले होते एकत्र

या प्रकरणातील संशयित पत्नीशी (45) असलेल्या अनैतिक संबंधांमुळे डॉक्टरांच्या पहिल्या पत्नीने काही वर्षांपूर्वी आत्महत्या करून घेतली आहे. पहिल्या पत्नीच्या आत्महत्या प्रकरणात या डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. त्यात ते पाच-सहा वर्षे कारागृहात शिक्षा भोगत होते. डॉक्टरांना दुसर्‍या पत्नीपासूनही एक अपत्य झाले. मात्र, डॉक्टर कारागृहात गेल्याने तिने दुसर्‍याशी लग्न केले. ज्याच्याशी विवाह झाला त्याचाही काही वर्षांपूर्वी हृदयविकाराने मृत्यू झाला. दरम्यान, कोरोनापूर्वी डॉक्टर कारागृहातून सुटल्यावर पहिल्या पत्नीपासून झालेल्या मुलासह राहू लागले. यानंतर सध्याच्या संशयित पत्नीला कोरोना झाल्याने तिने डॉक्टरांच्या रुग्णालयात उपचार घेतले. तेव्हा दोघे पुन्हा एकत्र आले आणि त्यांनी रजिस्टर लग्न केल्याची समोर येत आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : अनैतिक संबंधात अडसर, डॉक्टर पतीला भुलीचे इंजेक्शन देत खुनाचा प्रयत्न appeared first on पुढारी.