Site icon

नाशिक : अनोळखी खूनाचा येवला तालुका पोलीसांनी लावला छडा

नाशिक (येवला) : पुढारी वृत्तसेवा

गेल्या महिन्यात झालेल्या अनोळखी इसमाचा खून झाला होता. मात्र या खुनाचा उलगडा येवला तालुका पोलिसांनी अवघ्या 21 दिवसात केला आहे.

दि. २१ एप्रिल २०२३ रोजी सकाळी ८ च्या सुमारास निळखेडा शिवार ता. येवला जि. नाशिक येथील विजया शांताराम कदम यांच्या शेतात बारदानामध्ये अर्धवट ठेवलेले प्रेत मिळून आले. याबाबत सोमठाणदेशचे गावकामगार पोलीस पाटील सुनिल कदम यांनी येवला तालुका पोलीस ठाण्याला कळविले. त्यावरुन आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. संशयिताविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर उच्चत्तरीय अधिकाऱ्यांबरोबर मनमाड उपविभागाचे पोलीस उप अधिक्षक समिरसिंह साळवे यांनी केलेल्या मार्गदर्शक सुचनानुसार येवला तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांचे येवला तालुका पोलीस ठाण्याकडील तपासपथक सहायक पोलीस निरीक्षक उज्वलसिंह राजपुत, सहायक पोलीस निरीक्षक एकनाथ भिसे, सहायक पो.उप निरी. अल्ताफ शेख, पो. हवा. माधव सानप, पोना राजेंद्र केदारे, पोना सचिन वैरागर, पोना ज्ञानेश्वर पल्हाळ, पो.कॉ. आबा पिसाळ, पो.कॉ. सागर बनकर, पो. कॉ. संतोष जाधव, पोकॉ. संदीप दराडे, पोका, नितीन पानसरे यांनी घटनास्थळाचे निरीक्षण केले. त्यानंतर विहीरीवरील मजुराची चौकशी करण्यात आली. सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक माहीतीचे विश्लेषण करुन अनोळखी मयताबाबत तसेच संशयित अज्ञात आरोपीबाबत तपास करीत असतांना तपास पथकास मिळालेल्या गुप्त माहीतीचे आधारे संशयित आरोपी कृष्णा बाळु कोकाटे (३६ वर्ष, रा. आंबेगांव ता. येवला जि. नाशिक), पांडुरंग गोविंदराव राठोड (४१, रा. करंजगव्हाण ता. मालेगांव जि. नाशिक) यांना ताब्यात घेवून चौकशी करण्यात आल्यानंतर आरोपींनी गुन्हा केल्याचे कबुल केले आहे.

आरोपी कृष्णा बाळु कोकाटे व मयत राजू (पूर्ण नांव माहीत नाही. रा. चांदुर जि. अमरावती) असे कटींग झाल्यानंतर दारु पिऊन लासलगांव येथून मोटार सायकलवर आंबेगांव येथे येत असतांना त्याचा रस्त्यात अपघात झाला. अपघातात मयत राजू यास जखमा झाल्या होत्या. त्याकारणावरुन मयत राजु व आरोपी कृष्णा कोकाटे यांच्यामध्ये भांडण झाले होते. त्यानंतर मयत राजू व आरोपी कृष्णा कोकाटे यांनी विहीरीवर येऊन अंघोळ करत असतांना त्यांच्यात पुन्हा वाद झाला. आरोपी कृष्णा कोकाटे याने मयत राजूचा दोन्ही हाताने गळा आवळून जिवे ठार मारले. त्यानंतर विहीरीत ढकलुन दिले. संशयित आरोपी पांडुरंग राठोड याने राजू मयत झाल्याचे सांगितल्यानंतर  आरोपी कृष्णा कोकाटे याने इलेक्ट्रीक मोटार चालू करुन विहीरीचे पाणी काढुन मयत राजू दोराच्या सहाय्याने बांधून बाहेर काढले. त्यानंतर आरोपी कृष्णा कोकाटे व पांडुरंग राठोड यांनी राजूचे प्रेत मोटार सायकलवर टाकून निळखेडा शिवारात आणले व खुनाचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला  संशयितांकडून मयताची ओळख पटविण्याचा प्रयत्न सुरु असून आरोपींना पाच दिवस पोलीस कस्टडी रिमांड मिळाली आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : अनोळखी खूनाचा येवला तालुका पोलीसांनी लावला छडा appeared first on पुढारी.

Exit mobile version