नाशिक : …अन् अमेरिकन हॅकर्सचा प्रयत्न महापालिकेने पाडला हाणून

Online Fraud

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शहरातील नागरिक, महापालिकेशी संबंधित कर्मचारी तसेच मनपाचा महत्त्वाचा डेटा क्रॅक करून संगणक यंत्रणा ठप्प करण्याचा प्रयत्न काही दिवसांपूर्वी एका अमेरिकन हॅकर्सने केला होता. परंतु, हा प्रयत्न नाशिक मनपाच्या आयटी विभागातील कर्मचार्‍यांच्या समयसूचकतेमुळे हाणून पाडण्यात आला.

मनपाने याबाबत कोणत्याही प्रकारची वाच्यता केली नाही, त्यामुळे हा प्रकार समोर येऊ शकला नाही. मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी सायबर पोलिसांत तक्रार दाखल केली. फायर वॉलवर 24 तास टकटक करून अडचणी निर्माण करू पाहणार्‍या हॅकर्सला पळवून लावण्यासाठी मनपाच्या संगणक विभागातील कर्मचारी तसेच तज्ज्ञांनी त्याला चोख प्रत्युत्तर देत हॅकर्सचा डाव हाणून पाडण्यात यश मिळविले. मनपाच्या 43 विभागांपैकी बहुतांश विभागांचे संगणकीकरण करण्यात आलेले आहे. शहराचा संपूर्ण डेटा तसेच नागरिकांची माहिती आणि कर्मचारी, अधिकार्‍यांविषयीची माहिती संगणकात आहे. मनपाच्या संगणक विभागाच्या माध्यमातून यंत्रणेवर नियंत्रण ठेवले जात असून, मागील आठवड्यात संगणक विभागाने महत्त्वपूर्ण कामगिरी बजावत डेटा सुरक्षित ठेवण्याचे काम केले आहे. आठ दिवसांपूर्वी संगणक नेटवर्कमध्ये व्हायरस घुसल्याने 24 तास संगणकीय यंत्रणा ठप्प झाली होती. विशेष म्हणजे हा प्रकार सुटीच्या दिवशी घडल्याने त्याविषयी वाच्यता झाली नाही. परंतु, व्हायरस हटविणे महत्त्वाचे असल्याने संगणक विभागाने त्यानुसार काम केले.

ग्लोबल आयपी अ‍ॅड्रेस तपासणीनंतर अमेरिकन हॅकर्स असल्याची बाब समोर आली. संगणक नेटवर्कमध्ये घुसलेला व्हायरस हटविला नसता, तर महापालिकेला मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले असते.

फायरवॉलवर हिट्स
संगणकावरील डेटा सुरक्षित ठेवण्याचे काम फायरवॉलच्या माध्यमातून होत असते. हॅकर्सकडून फायरवॉलवर सातत्याने हिट्स दिल्या जात होत्या. त्यात फायरवॉल क्रॅक होते. क्रॅक झाल्यानंतर फायरवॉल पूर्णपणे दुरुस्त करणे गरजेचे असते. संपूर्ण संगणक फॉरमॅट करावे लागते.

महापालिकेच्या संगणक नेटवर्कमध्ये काही दिवसांपूर्वी हॅकर्सने बिघाड करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, तो व्हायरस हटवण्याचे काम आपल्या आयटी विभागातील कर्मचार्‍यांनी योग्य पद्धतीने केले. हॅकर्स व व्हायरस हटवण्यात आला असून, याबाबत सायबर पोलिसांना माहिती दिली आहे.
– डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, आयुक्त

हेही वाचा :

The post नाशिक : ...अन् अमेरिकन हॅकर्सचा प्रयत्न महापालिकेने पाडला हाणून appeared first on पुढारी.