नाशिक : ..अन् आदिवासी विद्यार्थ्यांना घडले ‘नाशिक दर्शन’

विद्यार्थी www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
अंबड येथील ग्लोबल व्हिजन शाळेने आशाकिरणवाडी शाळेतील विद्यार्थ्यांची नाशिक दर्शन सहल घडवून आणली. गावकुसाबाहेर पडत शहरभेटीचे स्वप्न विद्यार्थ्यांचे पूर्ण झाले. शहरातील मोठे रस्ते व वाहतूक सिग्नल बघण्यातही आनंद असतो, हे त्या आदिवासी मुलांच्या डोळ्यात दिसत होते. मोठ्या बसमधून प्रवास करत गंगापूर धरण, बालाजी मंदिर, सोमेश्वर, पंचवटी, पांडवलेणी, बुद्धविहार असे सगळे एका दिवसात बघून स्वतःचे कलागुण रंगमंचावर सादर केले. त्या इवल्याशा डोळ्यांमध्ये उत्साह, कुतूहल, आनंद ओसंडून वाहत होता.

ग्लोबल व्हिजन शाळेच्या संचालिका विजयालक्ष्मी मणेरीकर, रोटरी क्लब मिडटाउन नाशिकच्या डॉ. मनीषा जगताप, इनरव्हीलच्या अध्यक्षा चैताली शिंदे व जि. प. सदस्या छाया पाटील यांच्या हस्ते आशाकिरणवाडी शाळेतील विद्यार्थ्यांना वस्तूंचे वाटप करण्यात आले. प्राथमिकच्या 78, तर अंगणवाडीतील 36 अशा सुमारे शंभर आदिवासी मुलांना शाळेचे स्वेटर्ससोबत शूज, सॉक्स, स्टेशनरी, टी-शर्ट देण्यात आले. जेवणानंतर रंगमंच कलागुण दर्शन, फिल्म बघणे, मुलांबरोबर मैदानी खेळ मग नाशिक दर्शन, असे संपूर्ण दिवसाचे नियोजन करण्यात आले होते. आदिवासी लहान विद्यार्थ्यांसाठी ‘नाशिक दर्शन’ संकल्पना ग्लोबल व्हिजन शाळेच्या संचालिका मणेरीकर यांची असून, त्यांच्या अभिनव उपक्रमाला दानशूरांचा हातभार लागला. विशेषत: रोटरी क्लब ऑफ मिडटाउन, महावीर पॉलिटेक्निक, हरिवर्षा मेडिकल फाउंडेशन आदींचा त्यात समावेश आहे. हरीश संघवी व दिलीप काळे यांचेही या उपक्रमासाठी विशेष सहकार्य लाभले. दरम्यान, शहरातील मुलांना मूल्यशिक्षण हे उपक्रमांमध्ये सहभागी करून घेत दिले पाहिजे. हेच संस्कार आनंदी अर्थपूर्ण जीवन जगण्यास आवश्यक ठरतात. आदर्श नागरिकांची जडणघडण ही शालेय जीवनापासून होत असल्याचे मणेरीकर यांनी सांगितले.

उबदार कपड्यांचे संकलन
यंदा थंडीचा गारठा संपूर्ण जिल्ह्यात भयंकर जाणवतोय, तर आदिवासी पाड्यावर किती जाणवत असेल ? याचा विचार न केलेला बरा. काही दिवसांपूर्वी शाळेच्या विद्यार्थ्यांना आवाहन केले की, पाड्यावरच्या लहान दोस्तांचा यावर्षीचा हिवाळा थंडीचे कपडे देऊन उबदार करायचा आहे आणि अवघ्या चार दिवसांत शंभरपेक्षा जास्त मुलांनी उबदार कपडे छोट्या बालदोस्तांसाठी आणून दिले.

हेही वाचा:

The post नाशिक : ..अन् आदिवासी विद्यार्थ्यांना घडले ‘नाशिक दर्शन’ appeared first on पुढारी.