Site icon

नाशिक : अन् चाहूल लागताच मादी तीन बछड्यांसह फरार

वावी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

मिरगाव शिवारात सायाळे रस्त्यावर एका वस्तीवरील जुन्या घरात बिबट्या मादी तीन बछड्यांसह दबा धरून बसल्याचे परिसरातील काही शेतकऱ्यांच्या लक्षात आले. बिबट्या मादीच्या डरकाळ्यांनीच शेतकऱ्यांना हा सुगावा लागला. त्यामुळे सतर्क होऊन जुन्या घराचा दरवाजा जेसीबीच्या सहायाने बंद करून मादी व बछड्यांना जेरबंद करण्याची योजना आखण्यात आली. मात्र चाहूल लागताच या मादीने बछड्यांसह पलायन केले. त्यामुळे शेतकरी धास्तावले आहेत. बुधवारी (दि. २२) सायंकाळी ६ च्या सुमारास ही घटना घडली.

गेल्या १५ ते २० दिवसांपासून या भागात बिबट्या मादी व बछड्यांचा वावर असल्याने शेतकरी दहशतीखाली वावरत आहेत. बुधवारी सिन्नर – शिर्डी महामार्गापासून जवळच मिरगाव शिवारात श्यामलाल जाजू यांची वस्ती आहे. तिथे एक जुने पडीक घर आहे, त्यात कोणीही राहात नाही. या रिकाम्या घरातून शेतकऱ्यांना बिबट्याच्या डरकाळ्या ऐकायला आल्या. त्यामुळे शेतकऱ्यांनी वनविभागाला माहिती दिली. कर्णोपकर्णी परिसरात माहिती पसरल्याने वावी, मलढोण, मिरगाव परिसरातील नागरिकांचीही मोठी गर्दी झाली. गेल्या काही दिवसांपासून दहशत निर्माण करणारी मादी व बछडे यांना जेरबंद करण्याची योजना आखण्यात आली.

मादी बछड्यांसह जुन्या घरात दबा धरून बसलेली असल्याने जेसीबीच्या साह्याने घराचा पुढचा दरवाजा बंद करण्यात आला. मात्र बराच वेळ आत शांतता जाणवू लागल्याने नागरिकांनी खात्री केली असता नागरिकांची चाहूल लागल्याने अंधाराचा फायदा घेत मादी बछड्यांसह फरार झाल्याचे लक्षात आले. वनविभागाने घटनास्थळी गुरुवारी (दि. २३) सकाळी पिंजरा लावण्याचे नियोजन केले असल्याची माहिती वनपरिमंडळ अधिकारी अनिल साळवे यांनी दिली.

महिनाभरापूर्वी दुचाकीस्वारांवर हल्ला 

गेल्या १५ दिवसांपासून शेतकऱ्यांना व गुराख्यांना घडत आहे. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. महिनाभरापूर्वी मिरगाव फाट्यावर दोन दुचाकीस्वारांच्या अंगावर बिबट्याने झडप घातली होती. यात दोघे शेतकरी गंभीर जखमी झाले होते. यामुळे शेतकऱ्यांमध्ये बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे.

हेही वाचा : 

The post नाशिक : अन् चाहूल लागताच मादी तीन बछड्यांसह फरार appeared first on पुढारी.

Exit mobile version