नाशिक : अपघातानंतर मनपा अ‍ॅक्शन मोडवर, ‘हॉट ब्लॅक स्पॉट’वरील अतिक्रमणधारकांना नोटिसा

ब्लॅकस्पॉट अतिक्रमण

नाशिक, पंचवटी : पुढारी वृत्तसेवा
औरंगाबाद रोडवरील मिरची हॉटेल सिग्नल चौकातील भीषण अपघातानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदेश देऊनही दुसर्‍या दिवशी मनपाकडून कार्यवाही न झाल्याने दै. ‘पुढारी’ने ‘ऑन दी स्पॉट’ पाहणी करून सोमवारी (दि.10) वृत्त प्रसिद्ध केले. या वृत्ताची दखल घेत महापालिका प्रशासन अ‍ॅक्शन मोडवर आले असून, सोमवारी या रिंग रोडवरील बहुतांश अतिक्रमणे हटविण्यात आली आहेत. तसेच चौकाच्या आजूबाजूला असलेल्या अतिक्रमणधारकांना नोटिसा बजावल्या आहेत. अपघाताला कारणीभूत ठरणारी अतिक्रमणे लवकरच हटवून चौकाचे रुंदीकरण करण्याबाबतही नियोजन करण्यात आल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले.

वारंवार अपघात घडणार्‍या ‘हॉट ब्लॅक स्पॉट’वर उपाययोजना करा, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले होते. पालकमंत्री व इतर लोकप्रतिनिधींनीही यासंदर्भात सूचना दिल्या होत्या. यानंतरही महापालिकेने तत्काळ कार्यवाही सुरू केली नाही. याकडे लक्ष वेधण्यासाठी दै. ‘पुढारी’ने घटनास्थळाची पाहणी करून ‘हॉट ब्लॅक स्पॉट किती बळी घेणार’ या मथळ्याखाली सोमवारी वृत्त प्रसिद्ध केले. वृत्त प्रसिद्ध होताच खडबडून जागे झालेल्या महापालिका प्रशासनाने या चौकासह रिंग रोडवर कारवाई सुरू केली. उपआयुक्त करुणा डहाळे यांच्या आदेशानुसार पंचवटी अतिक्रमण निर्मूलन पथकाने औरंगाबाद नाका ते नांदूर नाका आणि अमृतधाम ते जय शंकर गार्डनदरम्यानच्या टपर्‍या, शेड असे अतिक्रमण हटविले. पक्के बांधकाम असलेल्या अतिक्रमणधारकांना अतिक्रमण काढून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

पंचवटीच्या नगर नियोजन विभागाने चौकाचे विस्तारीकरण तसेच टर्निंग पॉइंट विस्तृत करण्याबाबत सर्व्हेयरमार्फत जागेवर सर्व्हे केला असून, काही ठिकाणी रेखांकन करण्यात आले आहे. उर्वरित रेखांकनाचे काम येत्या काही दिवसांत पूर्ण करण्यात येणार आहे. चौकालगत असणार्‍या व रस्ता विस्तारीकरणात बाधित होणार्‍या सर्व पक्क्या अतिक्रमणधारकांना पंधरा दिवसांच्या आत अतिक्रमण काढून घेण्याच्या नोटिसा देण्यात आलेल्या आहेत. मुदतीत अतिक्रमण न काढल्यास मनपा अतिक्रमण काढणार असून, त्याचा खर्च अतिक्रमणधारकांकडून वसूल करण्यात येणार आहे, अशा सूचनादेखील देण्यात आलेल्या आहेत.

राजकीय पुढार्‍यांची अतिक्रमणे हटतील?

मिरची चौकाच्या आजूबाजूला विविध राजकीय पदाधिकार्‍यांची अतिक्रमणे मोठ्या प्रमाणात असल्याने ती अतिक्रमणे मनपाकडून काढण्यात येतात की, केवळ नोटिसा देण्याची औपचारिकता साधली जाते, याकडेही सामान्य नागरिकांचे लक्ष लागले आहे.

मनपाच्या सापत्न वागणुकीची चर्चा

औरंगाबाद रोड भागातील रस्त्यालगत छोटे व्यवसाय करणारे, फेरीवाले, टपरीवाले यांची अतिक्रमणे मनपाकडून त्वरित काढण्यात आली. मात्र, याच रस्त्यावर राजकीय पुढार्‍यांची पक्की अतिक्रमणे काढण्यास त्यांना वेळ देण्यात आल्याने मनपाच्या अशा सापत्न वागणुकीची औरंगाबाद रोडवरील नागरिकांमध्ये जोरदार चर्चा आहे.

स्त्यातील विद्युत पोल ‘जैसे थे’च!

रस्त्यातील टर्निंग पॉइंटच्या मधोमध येणार्‍या विद्युत पोलबाबत मनपाकडून कुठलाही पत्रव्यवहार अथवा कार्यवाही करण्यात आलेली नाही. त्याबाबत महावितरण अधिकार्‍यांकडून माहिती घेतली असता, त्याबाबत ते अनभिज्ञ असल्याचे आढळले.

हेही वाचा :

The post नाशिक : अपघातानंतर मनपा अ‍ॅक्शन मोडवर, ‘हॉट ब्लॅक स्पॉट’वरील अतिक्रमणधारकांना नोटिसा appeared first on पुढारी.