Site icon

नाशिक : अबब… बाजरीला तब्बल ‘इतक्या’ फुटांचा कणीस, वासोळच्या शेतकर्‍याचा प्रयोग चर्चेत

नाशिक, लोहोणेर : पुढारी वृत्तसेवा
बाजरी तसे पारंपरिक पीक सर्वांनीच अनुभवले. पण आजवर आपण साधारण फूटभर लांब कणीस पाहिले असेल, मात्र देवळा तालुक्यातील वासोळच्या शेतकर्‍याने पेरलेल्या बाजरीला तब्बल तीन फुटांहून अधिक लांबीचे कणीस लागल्याने ही आश्चर्यकारक बाब परिसरात चर्चेचा विषय ठरली आहे.

लोहोणेर : अवघ्या 20 गुंठ्यांत पेरलेल्या बाजरीला तीन फुटांपर्यंत मोठे आलेले कणीस दाखविताना शेतकरी चिंतामण मोरे.

शेतकरीवर्ग पारंपरिक पिकांकडे पाठ फिरवून नगदी पिकांकडे वळला असताना, आता पारंपरिक पिकांतही नवनवीन प्रयोग होऊ लागले आहेत. देवळा तालुक्यातील वासोळ येथील शेतकरी चिंतामण संपत मोरे यांनी लावलेल्या बाजरीला तीन फुटांहून अधिक लांब कणीस आल्याने ते पाहण्यासाठी पंचक्रोशीतील शेतकर्‍यांची गर्दी होत आहे. मोरे यांनी राजस्थानहून दोन हजार रुपये किलो दराने बाजरीचे गावठी बियाणे आणून त्याची आपल्या शेतात पेरणी केली होती. यंदा पर्जन्यमान चांगले झाल्याने पीक चांगले जोमात आले. बहरलेल्या बाजरीला तब्बल तीन ते चार फुटांचे कणीस लागल्याचे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. त्याविषयी कानोकानी वार्ता पसरल्याने कुतूहल शमविण्यासाठी शेतकर्‍यांची पावले मोरे यांच्या शिवाराकडे वळत आहेत. एवढ्या लांबीची कणसे म्हणजे बियाणाची कमाल की, निसर्गकृपा याबाबत तर्क लढविले जात आहेत. त्यातून अशीच बाजरी घेण्यासाठी शेतकर्‍यांकडून मोरे यांच्याकडे आजच बियाणे आरक्षित करण्यास सुरुवात झाली आहे.

मोरे यांनी अवघ्या 20 गुंठ्यात ही बाजरी घेतली असून, त्यातून जवळपास 10 ते 15 क्विंटल बाजरीचे उत्पादन लाभेल, असा ठाम विश्वास व्यक्त होत आहे. नियमित पेरण्यात येणार्‍या बाजरी पिकापेक्षा तीपटीने जास्त उत्पादन हे बाजरी पीक देते, असा दावाही मोरे यांनी केला आहे. एकरी 40 ते 45 क्विंटल उत्पादन येत असून, यंदा पाउस जास्त असल्यामुळे 10 ते 15 क्विंटलपेक्षा जास्त उत्पादन येईल, असे ते सांगतात.

प्रयोगाने लखलाभ
बाजरी बियाणाची जात तुर्की असून, या कणसाची लांबी चार ते पाच फूट आहे. 20 गुंठ्यात पेरणीसाठी दीड किलो बियाणे लागले. विशेष म्हणजे यासाठी कोणतेही खत वापरलेे नाही. बियाणे म्हणून विक्री केल्यास त्यांना दोन हजार रुपये किलो या दराने त्यांना किमान 25 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न येईल, असे गणित मांडले जात आहे.

राजस्थान येथून बियाणे आणून बाजरीची पेरणी केली. त्यास तीन ते चार फूट लांबीची कणसे लागली, हे सत्य आहे. ते पाहण्यासाठी शेतकर्‍यांचे गट येतात. कमीत कमी क्षेत्रात भरघोस उत्पादन आल्याचे समाधान आहे. या बाजरीच्या बियाणाला अनेकांकडून मागणी होतेय. त्यानुसार ते उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असेल.
– चिंतामण मोरे, शेतकरी, वासोळ.

हेही वाचा :

The post नाशिक : अबब... बाजरीला तब्बल 'इतक्या' फुटांचा कणीस, वासोळच्या शेतकर्‍याचा प्रयोग चर्चेत appeared first on पुढारी.

Exit mobile version