नाशिक अमरधाममध्ये आतापर्यंत 2 हजार कोरोना मृतदेहांवर अंत्‍यसंस्‍कार

जुने नाशिक : शहरातील मुख्य नाशिक अमरधाममध्ये आठ महिन्यांत कोरोनाने मृत झालेल्या दोन हजार ५८ मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. सर्वाधिक शहरातील रुग्णांचा समावेश असून, नाशिक ग्रामीण भागातील मृतांचाही समावेश आहे. उत्तर महाराष्ट्रातील आणि मुंबई, ठाणे, पालघर येथीलही १९७ रुग्णांचे नाशिक अमरधाममध्ये अंत्‍यसंस्‍कार पार पडले.

ग्रामीण, परजिल्ह्यातील मृतांचाही समावेश

जिल्ह्यात २९ मार्च, तर शहरात एप्रिल महिन्यात पहिला कोरोनाबांधित रुग्ण आढळला होता. मे महिन्यापासून कोरोनाने मृत्यू झालेल्यांचा आकडा येऊ लागला. मृतांमुळे कुणाला संसर्ग होऊ नये म्हणून कोरोनाचे मृतदेह नातेवाइकांना दिले जात नव्हते. रुग्णालयातून थेट अमरधाममध्ये मृतदेह अंत्यसंस्काराला नेले जात. जुने नाशिक भागातील अमरधाम शहरातील मुख्य अमरधाम आहे. येथे विद्युत दाहिनी असल्याने संसर्ग टाळण्यात मदत होत असल्याने अमरधाममध्ये मृतांवर अंत्यसंस्कार झाले. शहर, जिल्हा, उत्तर महाराष्ट्रातील विविध जिल्हे, तसेच मुंबई, ठाणे, पालघर येथील रुग्णांचाही सामवेश आहे.

दोन हजार अंत्यसंस्कार

१ मेपासून ते नोव्हेंबर २७ पर्यंत एकूण दोन हजार ५८ अंत्यसंस्कार झाले. शहरातील एक हजार ९४९, नाशिक ग्रामिमीण ६४३, उत्तर महाराष्ट्र १६३, मुंबई व ठाणे, पालघर येथील ३४, तसेच नोव्हेंबर महिन्यातील १०९ रुग्णांचा समावेश आहे. यातील सर्वाधिक अंत्यसंस्कार विद्युत दाहिनीत झाले आहेत. सर्वाधिक अंत्यसंस्कार ऑगस्टमध्ये ६१७, त्यापाठोपाठ सप्टेंबरमध्ये ६१६ झाले. त्यानंतर प्रमाण कमी झाले.

नोव्‍हेंबरमध्ये १०९ मृतांचे अंत्‍यविधी

नोव्हेंबर महिन्‍यात गेल्‍या शुक्रवार (ता. २७)पर्यंत कोरोनाने निधन झालेल्‍या एकूण १०९ मृतांचे अंत्‍यविधी पार पडले. मृतदेहांची महिनाआखेरीस विभागणी होत असते.

...असे झाले अंत्यसंस्कार
महिना नाशिक शहर नाशिक जिल्हा उत्तर महाराष्ट्र मुंबई व ठाणे-पालघर एकूण

मे ०३ ०२ - - ०५
जून ५९ ३२ ०९ ०५ १०५
जुलै २०१ ९५ २२ ०५ ३२३
ऑगस्ट ३७८ १६८ ६४ ०७ ६१७
सप्टेंबर ३१३ २४७ ४७ ०९ ६१६
ऑक्टोबर १५५ ९९ २१ ०८ २८३