नाशिक : ‘अमर रहे, अमर रहे, खंडू बरकले अमर रहे’च्या जयघोषाने आगासखिंड दुमदुमला

वीर जवान www.pudhari.news

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा
आगासखिंड येथील वीर जवान खंडू बरकले यांना साश्रूपूर्ण नयनांनी हजारोंच्या समुदायाने निरोप देण्यात आला. अमर रहे, अमर रहे, खंडू बरकले अमर रहे, भारत माता की जय, वंदे मातरम् या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. माता-भगिनी, आबालवृद्ध, तरुण, तरुणी सर्वांचे डोळे पाण्याने डबडबलेले होते. संपूर्ण गाव शोकमग्न झाला होता.

गावातून तरुण, तरुणींनी आपल्या वीर पुत्राचे स्वागत करण्यासाठी संपूर्ण गावातील गल्लीगल्लीत केलेले सडासंमार्जन, रांगोळी अशी तयारी करण्यात आली होती. जवान खंडू बरकले यांच्या पार्थिवाचे आगमन होताच नातेवाइकांनी हंबरडा फोडला. माता भगिनी, आबालवृद्ध, तरुण-तरुणी सर्वांचे डोळे पाण्याने डबडबले होते. संपूर्ण गाव शोकमग्न झाले. भावुक वातावरणात अगासखिंड येथील वीर जवान खंडू बरकले यांना मुलगा ऋषिकेश याने अग्निडाग दिला. काश्मीर येथे आपले कर्तव्य बजावत असताना 22 फेब्रुवारी रोजी खंडू बरकले जबर जखमी झाले होते. त्यांच्यावर तेथेच एक शस्त्रक्रिया झाली होती. तेथून पुढे पुढील उपचारासाठी त्यांना 24 फेब्रुवारी रोजी कमांड हॉस्पिटल, चंदिगड येथे हलवण्यात आले होते. तेथे त्यांचे भाऊ रावसाहेब बरकले, पत्नी योगिता, मुलगा ऋषिकेश आणि मुलगी रितू तसेच सेवानिवृत्त कॅप्टन रामनाथ गवारे उपस्थित होते. मात्र, 13 -14 दिवस उपचार करूनदेखील त्यांना वाचवता आले नाही. 7 मार्च रोजी बरकले यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. बरकले यांचे पार्थिव रविवारी सकाळी चंदिगडवरून लष्कराच्या विशेष विमानाने मुंबई येथे आणण्यात आले आणि मुंबईवरून विशेष अ‍ॅम्ब्युलन्सने दुपारी साडेबारा वाजता सिन्नर तालुक्यातील आगासखिंड या मूळ गावी आणण्यात आले. बेलू फाट्यापासून दुतर्फा लोकांनी प्रचंड गर्दी केली होती. शहीद जवान खंडू यांचे भव्य स्मारक बांधण्याचा मनोदय ग्रामस्थांनी व्यक्त केला. यावेळी जिल्हाभरातील अनेक आजी-माजी सैनिक, सामाजिक शैक्षणिक राजकीय, धार्मिक, कृषी व लष्करी क्षेत्रातील तसेच गावासह पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रपती पुरस्कार विजेते प्रदीप शिंदे, कवी लक्ष्मणराव महाडिक, दत्तात्रय आरोटे यांनी सूत्रसंचालन केले. या कामी ग्रामपंचायत, सोसायटी, माजी सैनिक व ग्रामस्थांनी पुढाकार घेतला.

वीर जवान www.pudhari.news
शोकाकूल वीरपत्नी व नातेवाईक.

गावात भावपूर्ण वातावरण
गावातील एनसीसीचे विद्यार्थी तसेच भजन ग्रुप आणि तरुणांनी मानवी साखळी केली होती. निवासस्थानी पार्थिव अंतिम दर्शन घेण्यासाठी ठेवण्यात आले. यावेळी नातेवाइकांचा आक्रोश मन हेलावून टाकणारा होता. वीर जवान खंडू यांचे भाऊ दामू बरकले, नंदू बरकले, रावसाहेब बरकले आणि त्यांचा परिवार यांचे दुःख पाहून मन हेलावून जात होते.

वीर जवान www.pudhari.news

लष्करी जवानांकडून मानवंदना
प्रारंभी लष्कराच्या जवानांनी शासकीय इतमामात बिगुल वाजवून सलामी दिली. आर्टिलरी सेंटरच्या वतीने लेफ्टनंट कर्नल सतीश मिश्रा, सुभेदार पाठक, तसेच महाराष्ट्र शासनाच्या वतीने नायब तहसीलदार सागर मुंदडा, आमदार माणिकराव कोकाटे, माजी आमदार राजाभाऊ वाजे, जिल्हा सैनिक अधिकार्‍यांच्या वतीने, सिन्नर पोलिस ठाण्याच्या वतीने पोलिस निरीक्षक राजेंद्र कुटे, जिल्हा सैनिक संघटनेच्या वतीने विजय कातोरे, सरपंच मीना आरोटे, सोसायटीचे चेअरमन भरत आरोटे, वीरपत्नी योगिता, भाऊ दामू, नंदू आणि रावसाहेब, 356 ए/डीएससी युनिटच्या वतीने सुभेदार थापा यांनी पुष्पचक्र वाहून मानवंदना दिली.

The post नाशिक : ‘अमर रहे, अमर रहे, खंडू बरकले अमर रहे’च्या जयघोषाने आगासखिंड दुमदुमला appeared first on पुढारी.