नाशिक : अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त पोलिसांची दौड

पोलिसांची दौड नाशिक,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शहर पोलिसांच्या वतीने 25 जुलै ते 15 ऑगस्टदरम्यान 75 किमी दौडचे आयोजन करण्यात आले आहे. चार टप्प्यांत ही दौड होणार असून, त्यात पोलिसांसह नागरिकांनी धावून किंवा चालून हे अंतर पार करण्याचा संकल्प आहे. त्यानुसार सोमवारी (दि.25) सकाळी पोलिस आयुक्तालयापासून ही दौड सुरू झाली.

‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम’चा जयघोष करण्यात आला. पोलिस व विभागीय आयुक्तांसह इतर अधिकार्‍यांनी ध्वज दाखविल्यावर दौडला सुरुवात झाली. आयुक्तालयापासून अशोकस्तंभ, रविवार कारंजा, होळकर पूल, पंचवटी कारंजामार्गे संत जनार्दनस्वामी महाराज मठापर्यंत 10 किमी अंतर पोलिस अधिकारी-कर्मचारी धावले. यावेळी मार्गावर फुगे लावण्यात आले होते. दौडमध्ये पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे, विशेष पोलिस महानिरीक्षक बी. जी. शेखर, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, उपआयुक्त अमोल तांबे, संजय बारकुंड, विजय खरात, पौर्णिमा चौगुले, सहायक आयुक्त दीपाली खन्ना, डॉ. सिद्धेश्वर धुमाळ, वसंत मोरे, सोहेल शेख, मधुकर सोनवणे, अंबादास भुसारे, सीताराम गायकवाड यांच्यासह सर्व पोलिस निरीक्षक आणि कर्मचारी सहभागी झाले.

दौड सुरू असताना एनसीसी कॅडेट्सने फुलांचा वर्षाव केला. तर, पंचवटी कारंजा येथे एकतेचे दर्शन घडविण्यासाठी विविध धर्म-पंथ-जातीमधील संत, आदर्श, नेते यांच्या वेशभूषा केलेले विद्यार्थी सहभागी झाले.

हेही वाचा :

The post नाशिक : अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त पोलिसांची दौड appeared first on पुढारी.