Site icon

नाशिक : अमेरिकेत रंगला श्री स्वामी समर्थ विश्वशांती महोत्सव

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्ग आणि समर्थ गुरुपीठाच्या वतीने परमपूज्य गुरुमाउली अण्णासाहेब मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतेच अमेरिकेमध्ये ‘श्री स्वामी समर्थ विश्वशांती महोत्सव 2022’ चे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास अमेरिकास्थित भारतीय आणि स्थानिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याची माहिती अमेरिकेतून नुकतेच मायदेशी परतले असता सेवामार्गाचे देश-विदेश अभियानाचे प्रमुख नितीन मोरे यांनी दिली.

विविध नैसर्गिक, मानवनिर्मित आपत्ती येऊ नयेत आणि जगभर शांतता, बंधुभाव वृद्धिंगत व्हावा, उन्नती साधावी, यासाठी सेवामार्ग आणि गुरुपीठाच्या वतीने यूएसएमध्ये महोत्सव आयोजित करण्यात आला होता. यूएसएचे अनेक मान्यवर, स्टेट हाऊसचे प्रतिनिधी, परिषदांचे सदस्य, शिक्षण मंडळाचे प्रतिनिधी, विविध कॉर्पोरेट गटांचे कंट्री हेड इत्यादींनी प्रमुख पाहुणे म्हणून कार्यक्रमांना हजेरी लावली. या कार्यक्रमांमध्ये बाळ-गोपाळांचे सांस्कृतिक कार्यक्रम, स्वामी जप, स्तोत्र-मंत्रांचे पठण, मन:शांती साठी ध्यान व ढोल-ताशांच्या गजरात श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पादुकांची मिरवणूक असे विविध उपक्रम घेण्यात आले. सेवा मार्गाच्या आजवरच्या अमेरिकेतील सर्वांत मोठ्या व ऐतिहासिक कार्यक्रमात रैले (नॉर्थ कॅरोलिना) शहराचे मेयर टी. जे. क्वावेल, टाऊन काऊन्सिल मेंबर स्टीव्ह राव, टाऊन काऊन्सिल मेंबर सतीश गरिमेला हे सहभागी झाले. तर बे एरिया-कॅलिफोर्निया येथील कार्यक्रमात सनीवेल हिंदू टेम्पल चेअरमन बिर्ला, सुप्रसिद्ध गायक महेश काळे, पीएनजी ज्वेलर्सचे संचालक सौरभ गाडगीळ सहभागी झाले. श्री गुरुपीठाने यूएसएमध्ये नियमितपणे असे कार्यक्रम आयोजित करावे, अशी विनंती सर्वच मान्यवरांनी केली. विद्यार्थ्यांनी केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाने मान्यवर इतके प्रभावित झाले की मेयर क्वावेल यांच्यासह मान्यवरांनी मुलांसोबत नृत्यात सहभाग घेतला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विश्वशांति चा संदेश देण्यासाठी ‘हॅपी प्लॅनेट – हॅपी फ्यूचर’ या नाटिकेचे व ‘वर्ल्ड पीस रॅली’चे आयोजन केले. कार्यक्रमादरम्यान श्री गुरुपीठाच्या माध्यमातून सुरू असलेले उदात्त सामाजिक कार्य, प्रकाशन, आयुर्वेद, वास्तुशास्त्र, पर्यावरण-विज्ञान इत्यादी विविध सेवा मार्गाच्या स्टॉल्सचा लाभ भाविकांनी घेतला.

डेट्रॉइट व कॅलिफोर्नियात सेवा केंद्र सुरू…
अमेरिकेतील मिशिगन राज्यात डेट्रॉइट येथे व ‘बे एरिया – कॅलिफोर्निया’ येथे नितीन मोरे यांच्या हस्ते नवीन सेवा केंद्र सुरू झाले. या समारंभात अमेरिकेतील स्वामी भक्तांना बहुमूल्य आध्यात्मिक मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान उपस्थित भाविकांच्या विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी विनामूल्य आध्यात्मिक समुपदेशन सत्राचे आयोजन करण्यात आले होते. मिशिगन येथिल कार्यक्रमास लक्षेशोर ग्लोबल को-ऑपरेशनचे सीईओ आणि अध्यक्ष अविनाश रचमाळे, सामाजिक कार्यकर्त्या हेमा रचमाळे, मिशिगन हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हचे समस्य पद्मा कुप्पा आदी मान्यवर उपस्थित होते.

हेही वाचा:

The post नाशिक : अमेरिकेत रंगला श्री स्वामी समर्थ विश्वशांती महोत्सव appeared first on पुढारी.

Exit mobile version