नाशिक : अरे आवरा यांना! चक्क जिल्हाधिकारी कार्यालयातच प्री-वेडिंग शूट

जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

हेरिटेज वास्तू असलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात मंगळवारी (दि.३१) भावी संसाराची स्वप्ने रंगविणाऱ्या जोडप्याने चक्क विनापरवानगी प्री-वेडिंग शूटिंग केले. कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत या जोडप्याचे शूटिंग केले जात असताना त्यांना कोणीही न हटकल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जातेय. जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी या प्रकाराची दखल घेत चाैकशीचे आदेश दिले आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात तहसीलदार, प्रांत तसेच विवाह नोंदणी अधिकारी कार्यालये आहेत. याच विवाह नोंदणी कार्यालयात विवाहेच्छुक असलेले युवक नोंदणीसाठी येतात. मंगळवारीही (दि.३१) असेच एक जोडपे विवाह नोंदणीसाठी आले. मात्र, परिसरातील हेरिटेज वास्तू पाहून हे जोडपे त्याच्या प्रेमात पडले. मोह अनावर झालेल्या या दाम्पत्याने तेथेच फोटो शूटिंग सुरू केले. विशेष म्हणजे जोडप्यासोबत असलेल्या कॅमेरामननेही तत्काळ त्यांच्या विविध अँगलमधून या दाम्पत्याचे छायाचित्र काढले.

कार्यालयाच्या परिसरात विनापरवानगी प्री-वेडिंग शूट केले जात असताना तेथे उपस्थित सुरक्षारक्षक किंवा कर्मचाऱ्यांनी सदर जोडप्याला न हटकल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. हा सर्व जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांच्यापर्यंत पोहोचल्यानंतर त्यांनी तातडीने अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच संबंधित जोडप्याला समज देण्याच्या सूचनाही अधिकाऱ्यांना केल्या.

पुन्हा असे प्रकार नको

भविष्यात असे प्रकार पुन्हा घडू नये, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. तसेच कार्यालयाच्या आवारात वर्तन कसे हवे याचे मार्गदर्शन करणाऱ्या सूचना विवाह नोंदणी कार्यालयाच्या आत व बाहेर लावाव्यात, असेही दुय्यम निबंधकांना सांगण्यात आले.

हेही वाचा :

The post नाशिक : अरे आवरा यांना! चक्क जिल्हाधिकारी कार्यालयातच प्री-वेडिंग शूट appeared first on पुढारी.