नाशिक : अल्पवयीन मुलीशी विवाह करणारा संशयित जेरबंद

girl Kidnapping attempt

ओझर : पुढारी वृत्तसेवा
अल्पवयीन मुलींची विक्री करणार्‍या टोळीच्या तपासात एप्रिल महिन्यात बेपत्ता झालेल्या एका अल्पवयीन मुलीस मध्य प्रदेशच्या मंगरूल (जि. खरगोण) गावातून पोलिसांनी ताब्यात घेत तिचे लैंगिक शोषण करणार्‍या एका आरोपीस अटक केली. या टोळीत आणखी काही व्यक्तींचा समावेश असून, पोलिस त्यांच्या मागावर आहेत. आत्तापर्यंत पोलिसांनी तीन महिला आणि मध्य प्रदेशमधील तीन पुरुष, असे सहा संशयित जेरबंद केले आहेत.

ओझर येथील भगतसिंगनगरातून अपहरण झालेल्या तेरावर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करणार्‍या प्रियंका देवीदास पाटील ऊर्फ प्रियंका पानपाटील हिला ओझर पोलिसांनी जेरबंद केल्यानंतर लहान मुलींचे अपहरण करणार्‍या टोळीचा छडा पोलिसांना मोठ्या शिताफीने नऊ दिवसांत लावला. या टोळीने अपहरण केलेली ओझरमधील पहिली मुलगी शोधून काढल्यानंतर या टोळीच्याच चौकशी त्यांनी आणखी नाशिकमधील एका अल्पवयीन मुलीची मध्य प्रदेशात विक्री केल्याचे उघडीस आले. या टोळीने मध्य प्रदेशातील अरुण ताराचंद सालवे (28, रा. मंगरूल) यास लग्नासाठी मुलगी विकल्याची कबुली दिली. ओझर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक गणपत जाधव, पोलिस दुर्गैश बैरागी, रावसाहेब मोरे, अमोल सूर्यवंशी, एकनाथ हळदे, महिला पोलिस कर्मचारी गांगवे यांच्या पथकाने तातडीने मंगरूल गाठत पीडित अल्पवयीन मुलीची सुटका करीत तिला ताब्यात घेत आरोपी अरुण ताराचंद सालवे यास अटक केली. पोलिसांनी शोधलेली ही दुसरी पीडित मुलगी अल्पवयीन असून, तिच्यासोबत संशयित आरोपी अरुण सालवे याने बेकायदेशीरपणे लग्न केले. या मुलीला गुन्ह्यातील संशयित आरोपी प्रियंका पानपाटील आणि सुरेखा भिल या दोघींनी काम मिळवून देते, असे आमिष दाखवत पळवून नेले होते. याबाबत आरोपी अरुण सालवे, प्रियंका पानपाटील, सुरेखा भिल या तिघांविरोधात अपहरणासह लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण (पोस्को) आणि बालविवाह प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. पोलिस निरीक्षक अशोक रहाटे यांच्या मार्गदर्शनाखाली ओझर पोलिस करीत आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : अल्पवयीन मुलीशी विवाह करणारा संशयित जेरबंद appeared first on पुढारी.