नाशिक : अवकाळीचा ८,५०० हेक्टर क्षेत्राला फटका!

नाशिक,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

गेल्या तीन दिवसांत जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे १४५ गावांमधील ८ हजार ४६८.४९ हेक्टर क्षेत्रावरील पिके मातीमोल झाल्याचा प्राथमिक अहवाल जिल्हा प्रशासनाने तयार केला आहे. अवकाळीने सटाण्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे. कांदा, डाळिंब, द्राक्षासह अन्य पिकांना मोठा फटका बसला आहे.

जिल्ह्याला वादळी वाऱ्यासह अवकाळीने झोडपून काढले. तब्बल ११ तालुक्यांना अवकाळीने दणका दिला असून, काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात गारपीट झाली. त्याचा सर्वाधिक फटका पिकांना बसला आहे. तब्बल ८ हजार ४६८.४९ हेक्टरवरील पिकांची पावसाने नासाडी झाली आहे. तर ११ तालुक्यांतील तब्बल १३ हजार २८४ शेतकरी बाधित झाले आहेत. सटाणा तालुक्याला अवकाळीने सर्वाधिक तडाखा दिला आहे. तालुक्यात ५६६८.५ हेक्टर पिकांना फटका बसला. चांदवडमध्ये ७६०.४९, मालेगावी ६६६, तर सिन्नरला ३६६ हेक्टरचे नुकसान झाले आहे. अन्यही तालुक्यांमध्ये नुकसानीचे आकडेवारी अधिक आहे.

अवकाळी व गारपिटीमुळे जिल्ह्यात कांद्याचे सर्वांत जास्त नुकसान झाले असून, तब्बल ५८१४.८० हेक्टर कांद्याचे नुकसान झाले आहे. त्याखालोखाल ७७३.५ हेक्टरवरील डाळिंब तसेच ७५५.६९ हेक्टर द्राक्षपिके पावसाने मातीत गेले. याशिवाय ५१३.४० हेक्टरवरील भाजीपाला, २२७.६ हेक्टर गहू बाधित झाला. तसेच टोमॅटो, बाजरी, लिंबू, कांदा रोपे, हरभरा, जनावरांचा चारा, आंबा आदी पिकांची नासाडी झाली आहे. दरम्यान, शासनाने तातडीने पंचनामे पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार महसूल विभागाने कृषीच्या सहाय्याने नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे येत्या काळात नुकसानीची तीव्रता अधिक वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

अवकाळीचे नुकसान (हेक्टरी)

सटाणा ५६६८.५०, चांदवड ७६०.४०, मालेगाव ६६६, सिन्नर ३६६, देवळा ३५४.४०, निफाड ३४३.१९, नाशिक १५०, इगतपुरी ८७, नांदगाव ४०, दिंडोरी १७, कळवण १६, एकूण ८४६८.४९.

-अवकाळी-गारपिटीचा १४५ गावांना फटका

-६९२६.३० हेक्टर बागायती क्षेत्र बाधित

-१५४२.१९ हेक्टर बहुवार्षिक पिके पाण्यात

-तब्बल १३ हजार २८४ शेतकऱ्यांचे नुकसान

हेही वाचा :

The post नाशिक : अवकाळीचा ८,५०० हेक्टर क्षेत्राला फटका! appeared first on पुढारी.