Site icon

नाशिक: अवकाळीने निम्म्या शहराची बत्ती गूल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नाशिकमध्ये झालेल्या अवकाळी पावसानंतर वीजतारांवर झाडाच्या फांद्या पडून तसेच विजेचे खांब वाकल्याने अर्ध्याअधिक शहराची बत्ती गूल झाली. महावितरण कर्मचाऱ्यांनी सोमवारची (दि. ६) पहाट उजाडताच युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम हाती घेतले. पण बहुतांश भागांमध्ये सायंकाळपर्यंत विद्युतपुरवठा सुरळीत न झाल्याने आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शहरवासीयांचे मोठे हाल झाले.

नाशिक शहर व परिसरामध्ये रविवारी (दि. ५) मध्यरात्री दोनच्या सुमारास वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. सोमवारी (दि. ६) सकाळपर्यंत या पावसाचा जोर कायम होता. मात्र, अचानक आलेल्या पावसाने महावितरणच्या कारभाराची पुरती पोलखोल केली. पाऊस व वाऱ्यांमुळे झाड्यांच्या फांद्या वीजवाहिन्यांवर पडल्याने मध्यरात्रीपासून वीजपुरवठा खंडित झाला. काही ठिकाणी विद्युत पोल वाकल्याने त्याचा फटका वीज वितरणावर झाला. अगोदरच उन्हामुळे हैराण झालेल्या नागरिकांना वीजपुरवठा खंडित झाल्याने रात्र जागून काढावी लागली. त्यात आठवड्याचा पहिला दिवस असल्याने सकाळी कामावर जाण्याची लगबग सुरू होती. परंतु, वीज नसल्याने पाणीपुरवठा विस्कळीत होऊन चाकरमान्यांचे पुरते हाल झाले. त्यामुळे सकाळी-सकाळी पाण्यासाठी बादल्या व हंडे घेऊन वणवण फिरण्याची वेळ शहरवासीयांवर ओढावली. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी सोमवारी (दि. ६) सकाळपासून वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर मोहीम हाती घेतली. मात्र, अनेक ठिकाणी झाड्यांच्या फांद्या पडल्याने तसेच विद्युत पोल शतीग्रस्त झाल्याने वीजपुरवठा सुरळीत करण्यात अनेक अडचणी आल्या. काही भागांमध्ये सायंकाळपर्यंत विजेचा लपंडाव सुरूच राहिल्याने नागरिकांनी महावितरणच्या कारभाराविरोधात तीव्र संताप व्यक्त केला.

* वीजपुरवठ्याअभावी नागरिकांची रात्र अंधारात

* बहुतांश परिसरात पाणीपुरवठा विस्कळीत

* ग्रामीण भागातही वीजपुरवठा खंडित

* महावितरणला माेठा आर्थिक फटका

नाशिक : वीज वाहिन्यांची दुरुस्ती करून वीजपुरवठा सुरळीत करताना कर्मचारी. दुसऱ्या छायाचित्रात वीज वाहिन्यांवरील फांद्या बाजूला करताना कर्मचारी.

हेही वाचा:

The post नाशिक: अवकाळीने निम्म्या शहराची बत्ती गूल appeared first on पुढारी.

Exit mobile version