Site icon

नाशिक : अवकाळीमुळे चाळीतील कांदाही सडला; बळीराजा आर्थिक अडचणीत 

नाशिक (कळवण) : पुढारी वृत्तसेवा 
कळवण तालुका कांद्याचे आगर समजले जाते. कांदा पिकाची लागवड केल्यापासूनच मात्र अवकाळी पाऊस, गारपीट, खराब वातारणामुळे चाळीत साठवणूक केलेला कांदा देखील सडत असल्यामुळे बळीराजा पुन्हा संकटात सापडला आहे. अवकाळीमुळे ८० टक्के चाळीतील कांदा सडत असून चाळीतील सर्वच कांदा खराब होत असल्याने शेतकऱ्यांनी उत्पादनासाठी केलेला खर्चही निघणार नाही. शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्याचबरोबर कांद्याचे भाव घसरल्याने शेतकरी हतबल झाला आहे.
सततच्या अवकाळी पावसाने बळीराजाला जेरीस आणले आहे. कळवण तालुक्यात चाळीत टाकलेला उन्हाळी कांदा फक्त १५ दिवसात सडायला लागला आहे. काही ठिकाणी चाळीतील सर्व कांदा खराब झाला असून शेतकऱ्यांनी सडलेला कांदा शेतात फेकून दिला आहे. जागा भेटेल तिथे कांदा फेकून दिला जात आहे. यंदा अवकाळीने रब्बी हंगामात गव्हापासून ते उन्हाळी कांदा काढणीच्या हंगामात धुमाकूळ घालून शेतकरी बांधवांचे मोठे आर्थिक नुकसान केले आहे. तर यंदा फेबुवारीपासूनच अवकाळीने संपूर्ण रब्बी हंगाम नेस्तनाबूत केला आहे. कांद्याला गारपीटीमुळे गारांचा तडाखा पडल्यामुळे गारा पाऊस अन् सोसाट्याच्या वाऱ्यामुळे शेतात उभे असलेले पिके आडवे झाले.
गेल्या १५ दिवसांपूर्वी तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी कांदा चाळीत साठवणूक केली होती. मात्र अवकाळी पावसाचे पाणी या उन्हाळी कांद्याच्या कांदापातीमध्ये गेल्याने कांदा देठापासून सडण्यास सुरुवात झाली आहे. या कांद्याला भावच नसल्याने उन्हाळी कांदा साठवणुकीकडे शेतकऱ्याचा कल वाढला होता. मात्र लाखो रुपये खर्च करून हातातोंडाशी आलेले कांदा चाळीत सडू लागला आहे. अनेक शेतकऱ्यांनी उन्हाळी कांदा शेतातून काढला आहे. उत्पादनात घट झालेली असतानाही कांदा उत्पादक निराश न होता उन्हाळी कांदा साठवणूक करण्याचा निर्णय घेतला. नाफेडने कांदा खरेदी सुरु केली की, कांदाभाव वाढतील अशी भोळी आशा बाळगून कांदा चाळीत साठवणूक केली. मात्र, मार्च एप्रिल महिन्यामध्येमध्ये झालेला पाऊस उन्हाळी कांद्यासाठी त्रासदायक ठरला आहे. चाळीतील साठवणूक केलेला कांदा शेतकऱ्याच्या पाणावलेल्या डोळ्यासमोर फेकून दिला जात आहे. त्यामुळे बळीराजा मोठ्या संकटात सापडला आहे.
सतत झालेल्या अवकाळी पावसामुळे कांद्याच्या पातीमध्ये पाणी शिरल्याने कांदाचाळीतील ९० टक्के कांद्याचे नुकसान झाले आहे. शासनाने तत्काळ नुकसान भरपाई घ्यावी. – रवींद्र पाटील, शेतकरी.
एकूण २६७६९ हेक्टर क्षेत्रात कांद्याची लागवड
कळवण तालुक्यात ४३ हेक्टर खरीप ८६ हेक्टर खरीप तर १७८९ हेक्टर रब्बी / हंगामी असे १९१८हेक्टर कांद्याचे रोपवाटिका क्षेत्र असून लेट खरीप लागवड ६६० हेक्टर क्षेत्र आहे. जानेवारीच्या अखेर फेबुवारीच्या पहिल्या सप्ताहात रब्बी / उन्हाळी हंगामात २२४७ हेक्टर क्षेत्रात कांदा लागवड झाली असून फेबुवारीच्या दुसऱ्या सप्ताहात ३८६२ हेक्टर लागवड झाली. तालुक्यात एकूण २६७६९ हेक्टर क्षेत्रात कांद्याची लागवड झाली आहे.
शेतात काढलेला कांदा १५ दिवसात सडला. मार्चमध्ये झालेल्या अवकाळी पावसाचे पाणी कांद्याच्या गाभ्यात शिरले. कांदा काढणीनंतर टिकेल असे वाटले होते. परंतु पंधरवड्यातच कांदा सडला आहे. परिणामी कांदा फेकून देण्याची वेळ आली आहे. – बाळासाहेब पाटील असोली.
तातडीने कांदाचाळीचे पंचनामे करावे
मार्च महिन्यात ३६६ हेक्टर बाधित क्षेत्र ८८३ शेतकऱ्यांचे नुकसान झाले. तर एप्रिल महिन्यात १४०५ हेक्टर नुकसान झालेले ३३०० शेतकरी आहेत. कांदाचाळीत कांदा सडत असल्याने तातडीने चाळीचे पंचनामे करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
मार्च व एप्रिल महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस झाला होता. त्यावेळी जिल्हाधिकारी यांनी निवेदन दिले. पंचनामे देखील झाले. मात्र शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नसून आता हाच साठवणूकीतील कांदा चाळीत सडत आहे. शासनाने तत्काळ उपायोजना करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी. – जे. पी. गावित, माजी आमदार.

हेही वाचा:

The post नाशिक : अवकाळीमुळे चाळीतील कांदाही सडला; बळीराजा आर्थिक अडचणीत  appeared first on पुढारी.

Exit mobile version