नाशिक : अवैद्य मद्यविक्रीवर कारवाईचा बडगा

daru www.pudhari.news

नाशिक (देवळा)  : पुढारी वृत्तसेवा

पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांच्या विशेष पथकाने आज मंगळवारी (दि.२४) रोजी देवळा तालुक्यात सुरू असलेल्या अवैद्य दारू विक्री करणाऱ्या ढाब्यावर छापा टाकला. यामुळे तालुक्यातील रस्त्यावरील छोट्या मोठ्या हॉटेल व्यावसायिकांचे धाबे दणाणले असून, पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी अवैद्य रित्या सुरू असलेल्या धंद्यांवर कारवाईचा बडगा उगारल्याने या कारवाईचे मात्र सर्वसामान्य नागरिकांनी स्वागत केले आहे.

संपूर्ण जिल्ह्यात राज्य महामार्गवर व तालुकास्तरावरील मोठ्या शहरात, व्यापारी पेठेच्या गावांत रस्त्यांवर असलेल्या ढाब्यावर सर्रासपणे देशी विदेशी दारुची विक्री सुरू आहे. या अवैद्य व्यवसायास आळा घालण्यासाठी नव्याने दाखल झालेले पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी धडक कारवाई सुरू केली. बहुतांश ठिकाणी याप्रकारावर बंदी घालण्यात आल्याने जिल्हाभरात खळबळ उडाली आहे. देवळा तालुक्यात देखील खेड्यापाड्यात हा व्यवसाय जोमात सुरू आहे. त्यामुळे तरुण पिढी सुद्धा या व्यसनाकडे आकर्षित झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. दारूपाई अनेक कुटुंब बरबाद झाले असून, यामुळे अनेकांचा संसार देखील उघड्यावर आला आहे. अनेक गावात दारू बंदीचा ठराव झाल्यावर सुद्धा आजही याठिकाणी सर्रास उघड्यावर दारू विक्री व्यवसाय सुरु आहे. तात्पुरत्या कारवाई पलीकडे काहीही निष्पन्न होत नसल्याने पोलीसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. मात्र उमाप यांनी बजावलेल्या या धडाकेबाज कामगिरीचे  स्वागत केले जात आहे. या अवैद्य व्यवसायाला चपराक बसल्याचे दिसून येत आहे. देवळा तालुक्यात त्यांच्या पथकाने तीन ठिकाणी छापा मारून १० हजार ५०० रुपये किमतीची देशी विदेशी दारू जप्त केली. यामध्ये तालुक्यातील उमराणे परिसरातील हॉटेल शिवशाही येथे ५६२९ किमतीची देशी विदेशी दारू, हॉटेल आपुलकी येथे ३२९० रुपये किमतीची देशी दारू, हॉटेल गुरुकृपा येथे १५९० रुपये किमतीची देशी विदेशी दारू मिळून आली. या पथकात एपीआय शेख ,प्रवीण वाघमारे, श्रीकांत आहिरे, साईनाथ नागरे, रमेश महाजन, महिला पोलीस मंगला गांगोडे यांचा समावेश होतो. त्यांनी मिळालेल्या मालासह ,हॉटेल व्यावसायिकांना ताब्यात घेऊन कारवाई केली आहे. या घटनेमुळे तालुक्यात अवैद्य दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले असून,एकच खळबळ उडाली आहे.
हेही वाचा:

The post नाशिक : अवैद्य मद्यविक्रीवर कारवाईचा बडगा appeared first on पुढारी.