नाशिक : अवैध दारू वाहतूक करणाऱ्या दुचाकीने युवकाला उडविल्याने देवगावात रास्ता रोको

देवगाव रास्तारोको,www.pudhari.news

नाशिक (देवगाव) : पुढारी वृत्तसेवा

अवैध दारू वाहतूक करणाऱ्या भरधाव दुचाकीने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या माजी सरपंचाच्या मुलाला उडविण्याच्या धक्कादायक प्रकारानंतर संतप्त ग्रामस्थांनी रास्ता रोको केला. त्यानंतर पोलिसांनी गावात विविध ठिकाणी केलेल्या धडक कारवाईत बेकायदेशीर दारूसाठा पकडला. रात्री उशिरापर्यंत संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

माजी सरपंच विनोद जोशी यांचे पुत्र धनंजय जोशी हे आपल्या चार-पाच मित्रांसह रस्त्याच्या कडेला उभे असताना अवैध दारू घेऊन चाललेल्या एका दुचाकीने त्यांना धडक दिली. यात ते जखमी झाले. त्यांच्यासमवेत असलेले चार-पाच मित्र थोडक्यात बचावले. परिसरात सुरू असलेल्या अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई होईपर्यंत रस्त्यावरून उठणार नाही, असा कडक पवित्रा ग्रामस्थांनी घेतला. यावेळी पोलिस उपनिरीक्षक लहानू धोक्रट यांनी ग्रामस्थांना तत्काळ गावात धाडसत्र करून ठोस कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले.

पोलिस उपनिरीक्षक लहानू धोक्रट, पोलिस नाईक संदीप शिंदे, पोलिस नाईक औदुंबर मुरडनर, गणेश बागूल, पोलिस पाटील सुनील बोचरे यांच्या पथकाने कारवाई करत दारूसाठे जप्त केले. देवगाव परिसरात अवैध धंद्यांबाबत माहिती मिळताच लासलगाव पोलिसांनी कडक कारवाईचे आदेश दिले असून, आगामी काळात अवैध धंदे करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, अशी माहिती सहायक पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांनी दिली.

हेही वाचा :

The post नाशिक : अवैध दारू वाहतूक करणाऱ्या दुचाकीने युवकाला उडविल्याने देवगावात रास्ता रोको appeared first on पुढारी.