नाशिकरोड, पुढारी वृत्तसेवा : नाशिकरोड पोलिसांच्या पथकाने धडक कारवाई करत अवैध देशी-विदेशी मद्याचा मोठा साठा जप्त केला. पोलिसांच्या या कारवाईत एका कंपनीच्या चारचाकी वाहनासह एकूण तीन लाख 97 हजार 90 रुपायांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाने शहरातील सर्व पोलीस ठाण्यात परिसरातील अवैध धंदे बंद करण्याचे आदेश दिले आहे. त्याप्रमाणे कारवाई सुरू असताना पोलिसांना या मद्यसाठ्याची माहिती मिळाली. पोलिसांनी नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून कारवाईला सुरुवात केली.
एकलरे रोडवरील नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवाराच्या जवळपास हा मद्यसाठा येणार असल्याचे पोलिसांना समजले. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गणेश शेळके यांच्या उपस्थित गस्त सुरू करण्यात आली. यादरम्यान एम.एच. 12 जी. आर. 4277 या क्रमांकाच्या चारचाकी वाहनावर पोलिसांची नजर गेली. पोलिसांनी वाहनचालक आनंद पद्मनाभ शेट्टी, (वय 58 वर्षे, रा. वास्तु वैभव हाईट्स, प्रशांत नगर, पाथर्डीफाटा, नाशिक) याची चौकशी केली असता तो सुरुवातीला उडाउडवीची उत्तर देऊ लागला. त्यानंतर पोलिसांनी वाहनाची तपासणी केली. यावेळी त्यात अवैध मद्य साठा आढळून आला. पोलिसांनी चालकाला अटक करून अवैध मद्य साठा व चारचाकी वाहनासह तीन लाख 97 हजार 90 रुपायांचा मुद्देमाल जप्त केला.
पोलिसांनी चालकाविरुध्द तसेच दारूचा पुरवठा करणाऱ्या व्यक्ती विरोधात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५ (अ) (ई) प्रमाणे नाशिकरोड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पथकात अखलाक शेख, संदीप पवार, अनिल पवार, अरूण गाडेकर, भाऊसाहेब नागरे, यशराज पोतन, रोहीत शिंदे, कल्पेश जाधव, गोकुळ कासार, नाना पानसरे आदींचा समावेश होता.
The post नाशिक : अवैध मद्य साठ्यासह सव्वातीन लाखांचा मुद्देमाल जप्त appeared first on पुढारी.