नाशिक : अश्लील छायाचित्र व्हायरल करीत खंडणी मागणारा गजाआड

नाशिक www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

ओळखीच्या महिला, तरुणींचे अश्लील छायाचित्र व्हायरल करीत त्यांच्याकडे पैशांची मागणी करणाऱ्या संशयितास सायबर पोलिसांनी पकडले आहे. मृत्युंजय ऊर्फ अंशुमन राजेश पटेल (२४, रा. उत्तर प्रदेश) असे या संशयिताचे नाव आहे.

मार्च २०२० मध्ये पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, सोशल मीडियाच्या माध्यमातून तिची युवकासोबत ओळख झाली. प्रेम असल्याचे भासवून तरुणाने पीडितेस तिचे छायाचित्र मागवले. त्यानंतर हेच छायाचित्र तिच्या कुटुंबीयांना पाठवून त्याने पैशांची मागणी करीत धमकावले. या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात विनयभंग, खंडणीसह माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयिताने त्याचे मोबाइल क्रमांक, सोशल मीडिया खाते बंद केले होते. वाराणसी, सुरत, मोरबी येथे तो लपत होता. सायबरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक सुरेश कोरबू, अंमलदार किरण जाधव, संतोष काळे, विकास पाटील यांच्या पथकाने गुजरातमधील मोरबी येथे जाऊन संशयितास पकडले. त्याच्याकडील चौकशीतून त्याने याचप्रकारे इतर ४ ते ५ महिलांना फसवणूक केल्याचे आढळून आले. पटेल यास न्यायालयात हजर केले असता त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

सोशल मीडियाचा वापर करताना अनोळखी व्यक्तींसोबत संवाद साधू नये. त्यांना स्वत:ची वैयक्तिक माहिती देऊ नये, सोशल मीडियाच्या आहारी जाऊ नये. फसवणूक झाल्यास संबंधितांनी न घाबरता जवळच्या किंवा सायबर पोलिसांकडे तक्रार करावी. – प्रशांत बच्छाव, पोलिस उपआयुक्त.

हेही वाचा:

The post नाशिक : अश्लील छायाचित्र व्हायरल करीत खंडणी मागणारा गजाआड appeared first on पुढारी.