Site icon

नाशिक : अहिल्या नदीवरील पूल वादात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
राष्ट्रीय हरित लवादाने त्र्यंबकेश्वरमध्ये थेट नदीपात्रात बांधकामास परवानगी नाकारली असताना अहिल्यादेवी नदीपात्रात पूल उभारण्याचे काम सुरू आहे. या कामात हरित लवादाचे आदेश धाब्यावर बसविल्याचा आरोप पर्यावरणप्रेमींकडून होत आहे. या पुलाची जागा आखाड्याची असल्याचा दावाही करण्यात येत आहे. त्यामुळे अहिल्यादेवी नदीवरील हा पूल वादात सापडला आहे.

त्र्यंबकेश्वरला गोदावरी या प्रमुख नदीसह तिच्या अहिल्या, वैतरणा, ब—ह्मगिरी, नीलगंगा या उपनद्यांचा उगम होता. यापैकी गोदावरी आणि अहिल्या या दोन नद्यांचा संगम ज्याठिकाणी होतो तो भाग अत्यंत कमी क्षेत्राचा आहे. त्यातच अहिल्यादेवी नदीच्या पात्रात थेट पूल उभारण्याचे काम सुरू आहे. पण, याच बांधकामावरून सध्या वादाचे मोहोळ उठले आहे.

त्र्यंबकेश्वरचा परिसर इको-सेन्सिटिव्ह झोनमध्ये मोडतो. तसेच गोदावरीचे प्रदूषण आणि नदीचे खुंटलेले रूप बघता राष्ट्रीय हरित लवादाने नदीपात्रात थेट बांधकामास परवानगी नाकारली आहे. तसेच निळी व लाल पूररेषाही ठरवून देण्यात आल्याने शहरातील वाढत्या बांधकांमावर एकप्रकारे बंधने आली आहेत. मात्र, असे असतानाही त्र्यंबकेश्वर नगर परिषदेकडून अहिल्यादेवी नदीच्या पात्रात पुलाचे बांधकाम सुरू केले आहे. पण हा पूल म्हणजे बोटावर मोजण्याइतक्या भूमाफियांसाठी उभारला जात असल्याचा आरोप पर्यावरणप्रेमींकडून होत आहे. या सर्व प्रकाराविरोधात पर्यावरणप्रेमी ललिता शिंदे यांनी न्यायालयाच्या निर्णयाविरोधात केलेल्या कृतीविरोधात अवमानयाचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.

आज जागेवर पाहणी
अहिल्यादेवी नदीपात्रातील पुलासंदर्भात जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी गुरुवारी (दि.13) त्र्यंबक नगर परिषदेच्या मुख्याधिकार्‍यांना पाचारण करत माहिती जाणून घेतली. त्यानुसार जिल्हाधिकार्‍यांनी शुक्रवारी (दि. 14) जागेवर जाऊन पाहणी करावी. यावेळी तक्रादारांनादेखील आमंत्रित करून त्यांच्या शंका दूर कराव्यात, असे आदेश दिल्याची माहिती मुख्याधिकारी संजय जाधव दिली.

हेही वाचा :

The post नाशिक : अहिल्या नदीवरील पूल वादात appeared first on पुढारी.

Exit mobile version