नाशिक : अ‍ॅम्ब्युलन्सचालकांची दिवाळी अंधारात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यात जिल्हा ग्रामीण 102 रुग्णवाहिका कंत्राटी वाहनचालकांना गेल्या चार महिन्यांपासून पगार नसल्याने त्यांची दिवाळी जवळपास अंधारातच गेली आहे. केंद्र शासन पुरस्कृत सीएससी लिमिटेड दिल्लीच्या कंपनीने संबंधित सेवापुरवठा करण्याचा ठेका घेतलेला आहे. याबाबत सार्वजनिक आरोग्य विभाग व संबंधित सीएससी कंपनीकडे पगाराबाबत मागणी करूनही पगार दिला गेलेला नाही. याबाबत संबंधित कर्मचारी यांनी नाशिक जिल्हा परिषद गेटसमोर आंदोलन केले आहे.

महाराष्ट्र राज्याच्या आरोग्य विभागात कंत्राटी स्वरूपात बाह्ययंत्रणेकडून 102 या रुग्णवाहिकासाठी चालक बाह्ययंत्रणेकडून मानधनावर कार्यरत आहेत. हे वाहनचालक मानधनावर असतानाही दिवस-रात्र 24 तास सेवा बजावतात. पण ऐन दिवाळीला मानधन म्हणून असलेला पगारही त्यांना मिळालेला नाही. संबंधित कर्मचार्‍यांनी शासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी यांना भेटून याबाबत माहिती दिली आहे. तरी त्याकडे कोणीच लक्ष दिलेले नाही. केवळ फक्त आश्वासन मिळत गेले.

संबंधित रुग्णवाहिका चालकांना केवळ 11 हजार मानधन असून, ते 24 तास काम करण्याच्या मानाने खूपच तुटपुंजे असून, तेही वेळेवर 5 ते 6 महिने मिळत नाही. या सेवकांनी आपले कुटुंब चालवायचे कसे? या कंपनी ठेकेदाराकडून पीएफ आणि कुठलाही विमा मिळत नाही. याबाबत शासन लक्ष देणार का? कोविड महामारीच्या काळातही याच रुग्णवाहिका चालकांनी आपला जीव धोक्यात घालून आपली सेवा प्रामाणिक केली. याबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री, आरोग्य विभागाचे कर्तव्यदक्ष अधिकारी तुकाराम मुंढे यांनी लक्ष देऊन मानधन वेळेवर द्यावे, अशी मागणी या कर्मचार्‍यांनी केली आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : अ‍ॅम्ब्युलन्सचालकांची दिवाळी अंधारात appeared first on पुढारी.