Site icon

नाशिक : आजपासून जिल्ह्यात मेरी माटी मेरा देश अभियान

नाशिक ः पुढारी वृत्तसेवा

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाअंतर्गत संपूर्ण देशात राबवले जाणारे ‘मेरी माटी मेरा देश’ हे अभियान नाशिक जिल्ह्यातदेखील जिल्हा परिषदेच्या वतीने दि. ९ ते ३० या कालावधीत राबवले जाणार आहे. बुधवारी (दि. ९) या अभियानाला सुरुवात होत असून, जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात याबाबत सर्व अधिकारी-कर्मचारी शपथ घेणार आहेत. तर तालुकास्तरावर प्रत्येक पंचायत समिती कार्यालयांतर्गत गावागावांमधील अमृत सरोवर किंवा जलाशयाच्या ठिकाणी ७५ देशी वनस्पतींची लागवड करण्यात येणार आहे.

अभियानाची अंमलबजावणी करण्यासाठी तालुकास्तरावर सर्व गटविकास अधिकारी यांची नोडल अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. अभियानांतर्गत जिल्ह्यात ग्रामपंचायत स्तरावर व तालुकास्तरावर विविध उपक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये शिलाफलक उभारणे, स्वातंत्र्यसैनिक, वीरांना वंदन, पंचप्राण शपथ घेणे, ध्वजारोहण कार्यक्रम, माती कलशामध्ये गोळा करणे- प्रत्येक गावातील आणलेली माती एका कलशामध्ये गोळा करून या कलशावर तालुका, जिल्हा व राज्याचे नाव टाकून हा मातीचा कलश दि. 27 ते 30 ऑगस्ट या दरम्यान प्रधानमंत्री महोदयांच्या कार्यक्रमासाठी दिल्ली येथे घेऊन जाण्यास एका युवकाची निवड करण्यात येणार आहे.

याचसोबत वसुधा वंदनाचा कार्यक्रम ग्रामपंचायत स्तरावर असलेल्या अमृत सरोवराच्या ठिकाणी अथवा अमृत सरोवराचे परिसरात आयोजित करण्यात येणार आहे. अमृत सरोवर उपलब्ध नसल्यास इतर पाणीसाठ्यांचे ठिकाणी, ग्रामपंचायत किंवा शाळा परिसरामध्ये वृक्षलागवड करण्यात येणार आहे. त्यानुसार वसुधावंदन या उपक्रमांतर्गत ग्रामपंचायत स्तरावर 75 देशी वृक्षांची लागवड करण्यात येणार असून, संपूर्ण जिल्ह्यातील 1 हजार 388 ग्रामपंचायतींमध्ये एकूण 1 लाख 04 हजार 100 देशी वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. या वसुधा वंदन उपक्रमामध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून वृक्षलागवड करण्यात येणार आहे.

भविष्यात प्रत्येक ग्रामपंचायतस्तरावर अमृतवाटिका तयार होणार, वसुधा वंदन उपक्रमांतर्गत वृक्षलागवड व शिलाफलक कामांची एकूण अंदाजपत्रकीय रक्कम 1,70,436 आहे. त्यावर अपेक्षित मनुष्य दिवस निर्मिती 426 होणार आहे. वृक्षलागवडीसाठी वनविभाग, सामाजिक वनीकरण विभाग, अशासकीय संस्थांच्या रोपवाटिका, कृषी विभागाच्या रोपवाटिका यांच्यामार्फत उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

या अभियानांतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये गावात सेल्फी पॉइंट संख्या, शाळा महाविद्यालये यांच्यामार्फत गावातील घ्यावयाच्या स्पर्धा, चित्रकला, निबंध, वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. त्याचबरोबर प्रभातफेरी, सायकल/दुचाकी रॅली इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

The post नाशिक : आजपासून जिल्ह्यात मेरी माटी मेरा देश अभियान appeared first on पुढारी.

Exit mobile version