Site icon

नाशिक : आज रंगणार अ‍ॅथलेटिक्स स्पर्धा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महाराष्ट्र आणि जिल्हा अ‍ॅथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने मंगळवारी (दि.9) पंचवटीतील मीनाताई ठाकरे विभागीय क्रीडा संकुलाच्या सिंथेटिक ट्रॅकवर जिल्हा अजिंक्यपद अ‍ॅथलेटिक्स (मैदानी) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा खुल्या गटासाठी असल्या तरी 16 वर्षांवरील खेळाडूंना प्रत्यक्ष सहभागी होता येणार आहे. या स्पर्धेत एक खेळाडूला जास्तीत जास्त दोन प्रकारात सहभाग घेता येईल.

जिल्हा अजिंक्यपद अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत विविध अंतराच्या धावणे (रनिंग) स्पर्धा, लांब उडी, उंच उडी, भाला, फेक, थाळी फेक, गोळा फेक आदी क्रीडा प्रकारांचा समावेश असणार आहे. या स्पर्धेतील कामगिरीच्या आधारे नाशिक जिल्ह्यासाठी खेळाडूंची निवड केली जाणार आहे. हे निवड झालेले खेळाडू 24 ते 28 मे 2023 या कालावधीत पुणे येथे होणार्‍या राज्य अजिंक्यपद स्पर्धेत नाशिक जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करतील, अशी माहिती जिल्हा अध्यक्ष हेमंत पांडे आणि सचिव सुनील तावरगिरी यांनी दिली. जिल्हा अजिंक्यपद अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत सहभागी होणार्‍या खेळाडूंनी आपल्या जिल्ह्याच्या / संस्थेच्या मार्फत विहित नमुन्यात फॉर्म भरून आपला प्रवेश निश्चित करावा. स्पर्धांना मंगळवारी (दि.9) सकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत नाशिक जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभागी व्हावे, असे आवाहन असोसिएशनच्या वतीने करण्यात आले आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : आज रंगणार अ‍ॅथलेटिक्स स्पर्धा appeared first on पुढारी.

Exit mobile version