नाशिक : आठवड्याभरात महसूलमध्ये खांदेपालट शक्य, शासनाने मागविली माहिती

महसूल कार्यालय नाशिक ,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

राज्य शासनाने महसूल विभागात एकाच पदावर तीन वर्षे कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांची माहिती मागवलीची समजते आहे. तसेच महसूलमधून अन्य शासकीय विभागात वर्ग केलेल्या अधिकाऱ्यांना मूळ सेवेत रुजू होण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे येत्या आठवड्याभरात महसूल विभागात खांदेपालट होण्याची दाट शक्यता आहे.

राज्यातील सत्तापालट, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या लांबणीवर पडलेल्या निवडणुका तसेच सण-उत्सवांमुळे महसूल विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्या रखडल्या आहेत. सप्टेंबर महिना सुरू झाला तरी बदल्यांना मुहूर्त लागलेला नसतानाच मध्यंतरीच्या काळात दिवाळीनंतर खांदेपालटाची चर्चा रंगली. त्यामुळे बदलीस पात्र असलेल्या तसेच विनंती बदलीसाठी इच्छुक असलेल्या अधिकाऱ्यांमध्ये चलबिचल वाढली. या चर्चेला अनुसरून अनेकांनी मुंबईत मंत्रालयाच्या वाऱ्यादेखील केल्या. तर काही जणांनी देव पाण्यात ठेवले आहेत. मात्र, या सर्व घडामोडीत होत असताना गणेशोत्सवानंतर राज्य सरकार पुन्हा कामाला लागले आहे.

राज्य सरकारने पहिल्या टप्प्यात महसूल विभागातून अन्य शासकीय व निमशासकीय विभागात प्रतिनियुक्तीवर गेलेल्या अधिकाऱ्यांना कार्यमुक्त करत त्यांना मूळ सेवेत सामावून घेतले आहे. तसेच महसूलमधील बदलीस पात्र अधिकाऱ्यांची प्रतीक्षा यादी तत्काळ सादर करण्याचे आदेश जिल्ह्यांना दिल्याची खात्रीलायक माहिती मिळते आहे. या सर्व पार्श्वभूमीवर येत्या आठवड्याभरात बदल्यांचे आदेश निघण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे बदलीपात्र अधिकाऱ्यांचा उत्साह पुन्हा दुणावला आहे.

मुंबईच्या वाऱ्या वाढल्या

महसूल विभागात बदल्यांची चर्चा सुरू झाल्यामुळे सोयीच्या ठिकाणी बदलीसाठी जिल्ह्यातील अधिकाऱ्यांच्या मुंबई वाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. दिवसभर मंत्रालय तसेच मंत्र्यांच्या बंगल्यांवर हे अधिकारी चकरा मारत आहे. त्यामुळे येत्या काळात कोणाला अपेक्षित खुर्ची मिळणार आणि कोणाला डच्चू दिला जाणार हे स्पष्ट होईल.

हेही वाचा :

The post नाशिक : आठवड्याभरात महसूलमध्ये खांदेपालट शक्य, शासनाने मागविली माहिती appeared first on पुढारी.