Site icon

नाशिक : आता उदरनिर्वाह तरी करायचा कसा, गारपीटग्रस्त शेतकऱ्यांचा टाहो

नाशिक (चांदवड) : सुनील थोरे

संपूर्ण २० एकर क्षेत्रात कांद्याची लागवड केली होती, कांदा पीक जोमात असल्याने उत्पादन चांगले होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, काळ कोपला अन होत्याचे नव्हते झाले. ५ वाजेपर्यंत डोळ्यादेखत शेतात डोलणारे पीक अवकाळी गारपिटीत भुईसपाट झाले. दोन महिने राब-राब राबून कांद्याचे पीक घेतले होते. कांद्यावरच घरचा उदरनिर्वाह होता. आता तेच निसर्गाने हिरावून घेतले तर जगायचे कसे, कर्ज फेडायचे कसे, पोराबाळांचे लग्न करायचे कसे? या चिंतेने चांदवड तालुक्यातील पन्हाळे गावातील शेतकरी सूर्यभान नरहरी वाघ टाहो फोडत होते.

गारपिटीत हिरव्या मिरचीचे झालेले नुकसान.

पन्हाळे गावात शुक्रवारी (दि.१७) २० ते २५ मिनिटे अवकाळी पावसासह जोरदार गारपीट झाली. या गारपिटीत कांदा, गहू, हिरवी मिरची, टरबूज, कांद्याचे बियाणे (डोंगळा) यांचे अतोनात नुकसान झाले. या गारपीटीत सर्वाधिक लाल, उन्हाळ कांदा, टरबूज, मिरची पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पन्हाळे गावाचे शेतकरी सूर्यभान वाघ यांनी उन्हाळ कांद्याची २० एकर क्षेत्रात लागवड केली होती. एकरी ५० ते ६० हजार रुपयांप्रमाणे आतापर्यंत ६ ते ७ लाख रुपयांचा त्यांना खर्च आला आहे. कांदा पीक जोमात असल्याने कांद्याचे कसेही २० ते ३० लाख रुपये होतील, अशी अपेक्षा वाघ यांना होती. मात्र शुक्रवारी (दि.१७) सायंकाळी निसर्ग कोपला अन सर्व होत्याचे नव्हते करून गेला. कधी नव्हे एवढी गारपीट झाली की, संपूर्ण कांद्याची पात जमीनदोस्त होऊन गेली. यामुळे आता कांदा पीक पूर्णतः सडून जाणार आहे. यामुळे ५ ते १० टक्के सुद्धा उत्पादन होणार नसल्याने संपूर्ण वाघ कुटुंबीय हवालदिल झाले आहे. गावातील नागरिक येऊन वाघ कुटुंबीयांचे सांत्वन करीत आहेत.

दुसरीकडे खंडू आवारे यांच्या शेतात लावलेल्या हिरव्या मिरचीचेही पूर्ण नुकसान झाले आहे. गारांमुळे मिरचीच्या झाडाला एकही पान राहिले नव्हते. एवढ्या प्रचंड प्रमाणात गारपीट झाली. साधारणतः एक बिघा क्षेत्रफळावरील मिरचीचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचे ३ ते ४ लाखांचे नुकसान झाले आहे. तर दगू आवारे यांच्या टरबूज पिकांचे नुकसान झाले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून त्वरित आर्थिक मदतीची मागणी शेतकरी करीत आहेत.

एक एकर टरबुजांच्या वेली गारपिटीत मोडल्याने दगू आवारे यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. (सर्व छायाचित्रे : सुनील थोरे)

हेही वाचा:

The post नाशिक : आता उदरनिर्वाह तरी करायचा कसा, गारपीटग्रस्त शेतकऱ्यांचा टाहो appeared first on पुढारी.

Exit mobile version