नाशिक : पुढारी वृत्तसेवा- महापालिकेने इटलीहून खरेदी केलेल्या ३३ कोटींच्या चार यांत्रिकी झाडूद्वारे शहरातील रस्त्यांच्या स्वच्छतेला सोमवार(दि.४) पासून प्रारंभ होणार आहे. वाहनांची प्रादेशिक परिवहन विभागाकडील नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाली असून, चाचणीअंती यांत्रिकी झाडू रस्त्यावर उतरविले जाणार आहेत.
राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमांतर्गत केंद्र शासनाकडून प्राप्त अनुदानातून महापालिकेने रस्ते स्वच्छतेसाठी ३३ कोटींचे चार यांत्रिकी झाडू खरेदी केले आहेत. दोन वर्षांपूर्वी या यांत्रिक झाडू खरेदीचा निर्णय महापालिकेने घेतला होता. वर्षभर निविदा प्रक्रिया लांबल्यानंतर एप्रिल २०२३ मध्ये यंत्र पुरवठ्यासाठी मक्तेदार कंपनीला कार्यारंभ आदेश देण्यात आले होते. यंत्र पुरवठा करण्यासाठी आॉक्टोबर अखेरपर्यंतची मुदत देण्यात आली होती. इटलीहून हे यंत्र मागविण्यात आल्यानंतर प्रादेशिक परिवहन विभागाकडे या वाहनांची नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. आता चाचणीअंती या यंत्रांमार्फत रस्ते स्वच्छतेला सुरूवात केली जाणार आहे. एका यांत्रिकी झाडूमार्फत ४० किलोमीटरप्रमाणे प्रतिदीन १६० किलोमीटर रस्त्यांची सफाई केली जाणार आहे. यांत्रिकी झाडू खरेदीसाठी प्रत्येकी दोन कोटी सहा लाख रुपये असे एकुण बारा कोटी ३६ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. पुढील पाच वर्षाच्या कालावधीत ऑपरेशन, देखभाल दुरुस्ती, इंधन, मनुष्यबळ पुरविण्यासाठी दरमहा पाच लाख ८५ हजार ७०० रुपये खर्च होणार आहे. पाच वर्षासाठी २१ कोटी आठ लाख रुपयांच्या खर्चास महासभेने मंजुरी दिली आहे.
या रस्त्यांची होणार यांत्रिकी झाडूमार्फत स्वच्छता
* अशोक स्तंभ ते गंगापूर गाव.
* मुंबई नाका ते अशोक स्तंभ.
* सिबिएस ते कॅनडा कॉर्नर.
* कॅनडा कॉर्नर ते भोसला गेट.
* त्र्यंबक नाका सिग्नल ते सातपूर गाव.
* गडकरी चौक ते तिडके कॉलनी.
* चांडक सर्कल ते मुंबई नाका.
* महात्मा गांधी रस्ता, मेनरोड, नेहरु गार्डन, शालीमार.
* पंचवटी कारंजा ते रविवार कारंजा.
The post नाशिक : आता रस्ते होणार चकाचक, सोमवारपासून यांत्रिकी झाडूद्वारे स्वच्छता appeared first on पुढारी.