Site icon

नाशिक : आदिवासी महिला सरपंचांनी स्वतःच्या रक्ताने लिहलं पंतप्रधान मोदींना पत्र, केली ‘ही’ मागणी

मेशी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

नाशिक जिल्ह्यातील मेशी (ता. देवळा) येथील आदिवासी महिला सरपंच सुनंदा अहिरे यांनी ग्रामीण भागातील समस्या व खास करून शेतकरी कुटुंबांची झालेली वाताहत या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी स्वतःच्या रक्तानेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे.

ग्रामीण भागातील जनतेची तहान भागविण्यासाठी मागील वर्षी खासगी विहिरी अधिग्रहित करून गावातील जनतेला पाणी मिळवून दिले खरे, पण वर्ष उलटले तरीही शासनामार्फत सदर बिले अदा केली गेली नाहीत. शासनामार्फत शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या कृषी योजना, ट्रॅक्टर, अवजारे यांचे अनुदान वेळेत मिळत नाही. तसेच शेतकऱ्यांचा खास जीवन-मरणाचा प्रश्न म्हणजे कांदा होय. मात्र  देशाला स्वातंत्र्य मिळून पंचाहत्तर वर्षी उलटली तरीही कांदा हा दोनशे ते तीनशे रुपये प्रतिक्विंटल विकला जात असून त्यातून उत्पादन खर्च देखील निघत नाही. त्यामुळे कांद्याला किमान तीन हजार रुपये प्रतिक्विंटल भाव द्यावा अशी मागणी या पत्रातून सुनंदा अहिरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.

एक महिला सरपंच तसेच स्वतः शेतकरी कुटुंबातील असल्याने स्थानिक पातळीवर हे वरील सर्व प्रश्न खूप भेडसावत असल्याने या सर्व गोष्टींवर गांभीर्याने विचार करत शेतकऱ्यांना न्याय द्यावा. त्यातून किमान शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी होण्यास मदत होईल अशी विनंती अहिरे यांनी पंतप्रधान मोदी यांना रक्ताने लिहलेल्या पत्रात केली आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : आदिवासी महिला सरपंचांनी स्वतःच्या रक्ताने लिहलं पंतप्रधान मोदींना पत्र, केली 'ही' मागणी appeared first on पुढारी.

Exit mobile version