नाशिक: ‘आदिहाट’मुळे आदिवासींना मिळणार हक्काची बाजारपेठ; प्रजासत्ताकदिनी होणार उद्घाटन

आदीहाट www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

आदिवासी बांधवांच्या कलाकुसरीला हक्काची बाजारपेठ उपलब्ध होण्याच्या उद्देशाने आणि त्यांच्या कलांचे कायमस्वरूपी जतन व संवर्धन करण्यासाठी आदिहाट सुरू करण्यात येणार आहे. तसेच त्यामाध्यमातून आदिवासी महिला बचत गटांना रोजगार उपलब्ध करून देण्यात येणार आहे. प्रजासत्ताक दिनी अर्थात गुरूवारी (दि.२६) आदिवासी विकास आयुक्त, सर्व अपर आयुक्त व प्रकल्प कार्यालयात ‘आदिहाट’चे उद्घाटन हाेणार असल्याची माहिती आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त नयना गुंडे यांनी दिली.

महाराष्ट्रात अनेक आदिवासी जमाती आहेत. आदिवासी संस्कृती खूप संपन्न आणि समृद्ध आहेत. पाककृती, हस्तकला, बांबूकला, चित्रकला, औषधे यांनी आदिवासी समाज समृद्ध आहे. त्यांच्या या कलेचा रोजगार निर्मितीसाठी उत्तमप्रकारे वापर करण्यासाठी ‘आदिहाट’ची संकल्पना राबविण्यात येत आहे. आदिवासी समाजाकडून तयार करण्यात येणाऱ्या विविध वस्तू व साहित्य एकाच छताखाली ग्राहकाला उपलब्ध होणार आहे. त्यामाध्यमातून आदिवासी बांधवांना कायमस्वरूपी वस्तू विक्रीसाठी हक्काची बाजारपेठ मिळणार आहे. ‘आदिहाट’च्या माध्यमातून आदिवासी कुटुंबांनी तयार केलेल्या विविध कलाकुसरीच्या वस्तू, आदिवासी संस्कृतीशी निगडित साहित्य, वस्तू, खाद्यपदार्थ विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहेत. आदिवासी विकास विभागातंर्गत असणाऱ्या सर्व क्षेत्रीय कार्यालयासोबतच आदिवासींच्या स्थानिक जिल्ह्याच्या ठिकाणी असणारे रेल्वे आणि बसस्थानक येथेही आदिहाट उभारण्यात येणार आहे. आदिवासी बांधवांच्या हातातल्या कलाकुसरीला आदिहाटमधून शहरांच्या ठिकाणी असणारा जाणकार ग्राहकवर्ग मिळणार असून, त्यामुळे रोजगार निर्मितीसाठी मदत होणार असल्याचे आयुक्त गुंडे यांनी स्पष्ट केले.

वर्षभर असणार स्टाॅल
यापूर्वी विविध ठिकाणी होणाऱ्या प्रदर्शनामध्ये अनेक आदिवासी बचत गटांनी सहभाग घेतला आहे. मात्र, ते मर्यादित कालावधीपुरते असते. मात्र, आता ‘आदिहाट’मुळे वर्षभर स्टॉल उपलब्ध राहणार असल्याने आदिवासी कुटुंबांनी तयार केलेल्या विविध कलाकुसरीच्या वस्तू, आदिवासी संस्कृतीशी निगडित साहित्य व वस्तू, खाद्यपदार्थ आदी विक्रीसाठी राहणार असल्याचे आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त नयना गुंडे यांनी सांगितले.

हेही वाचा:

The post नाशिक: 'आदिहाट'मुळे आदिवासींना मिळणार हक्काची बाजारपेठ; प्रजासत्ताकदिनी होणार उद्घाटन appeared first on पुढारी.