Site icon

नाशिक : आधारतीर्थमधील चिमुकल्याच्या खुनाचा सावधगिरीने तपास

नाशिक/त्र्यंबक : पुढारी वृत्तसेवा
त्र्यंबकेश्वर जवळील तुपादेवी फाट्यानजीक असलेल्या आधारतीर्थ आश्रमात मंगळवारी (दि.22) सकाळी सहाच्या सुमारास साडे तीन वर्षीय मुलाचा खुन झाल्याचे उघड झाले आहे. यातील मारेकर्‍याची ओळख पोलिसांनी पटवल्याचे समोर येत आहे. मात्र गंभीर व संवेदनशील घटना असल्याने पोलिसांकडून सावधगिरीने तपास होत असून सर्व प्रकारे शहानिशा केली जात आहे. दरम्यान, खुनाच्या घटनेमुळे आधारतीर्थ आश्रमाच्या सुरक्षीततेसोबतच तेथील कामकाजाच्या पद्धतींबाबत चर्चांना उधाण आले आहे.
मंगळवारी सकाळी सहाच्या सुमारास आलोक विशाल शिंगारे या बालकाचा मृतदेह आश्रमाच्या पाठीमागील आवारात आढळून आला. मारेकरी अज्ञात असून त्याने आलोकचा गळा आवळून खून केल्याचे शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी आश्रमातच ठाण मांडून तपासास सुरुवात केली. पोलिसांनी आश्रमातील मुलामुलींसह कर्मचार्‍यांचीही चौकशी करीत जाबजबाब घेतले. दरम्यान, मृत आलोकचा मोठा भाऊ आयुष याने दिलेल्या माहितीनुसार, आश्रमातीलच विद्यार्थ्यासोबत वाद झाल्यानंतर त्याने आलोकला मारहाण केली होती. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस अधीक्षक, अपर अधीक्षक, उपविभागीय पोलिस अधिकारी व त्र्यंबकेश्वर पोलिसांनी आश्रमात चौकशी सुरु केली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांच्या तपासात आलोकच्या मारेकर्‍याची ओळख पटली तरी खुनाचे कारण अद्याप समोर आलेले नसल्याचे समजते. पोलिसांनी बुधवारी (दि.23) सायंकाळपर्यंत याप्रकरणी कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. खुनाचे कारण उलगडण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न आहेत.
सुरक्षीततेबाबत प्रश्नचिन्ह
वरिष्ठ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आश्रमात सीसीटीव्ही यंत्रणा किंवा सुरक्षारक्षक नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आश्रमातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याआधीही आश्रमातील एका विद्यार्थ्याचा संशयास्पद मृतदेह आढळून आला होता. मात्र त्याप्रकरणी उलगडा झाला नसल्याचे समजते. त्यामुळे या खुनाचा उलगडा करण्यासोबतच विद्यार्थ्यांच्या सुरक्षीततेबाबत उपाययोजना करण्याचे प्राधान्य यंत्रणेसमोर राहणार आहे.
बाल संरक्षण आयोगाच्या सदस्याची भेट
राज्य बाल संरक्षण आयोगाच्या सदस्या सायली पालखेडकर यांनी बुधवारी आश्रमात यांनी भेट देत माहिती घेतली. यात अनाथालय बालकल्याण विभागाची परवानगी न घेता सुरू असल्याचे लक्षात आले. त्यानंतर नाशिक महिला व बालकल्याण समितीच्या पथकानेही येथे भेट देत अनाथालय कसे सुरू याबाबत पंचायत समितीकडून महिला व बालकल्याण विभागाने अहवाल मागविला आहे. तर व्यवस्थापकांशी चर्चा केली असता आश्रमाची साई श्रध्दा चॅरिटेबल संस्था म्हणून नोंदणी करण्यात आलेली असून, त्यावर विश्वस्त म्हणून ठाणे, मुंबई परिसरातील व्यक्ती असल्याचे समोर आले आहे.
तळेगावी अंत्यसंस्कार
नातलगांनी आलोकचा मृतदेह मंगळवारी रात्री ताब्यात घेतला. त्यानंतर त्र्यंबकेश्वर येथील तळेगाव येथील स्मशानभूमीत आलोकवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेने आलोकची आई व भाऊ दु:खात असून पोलिसांनी त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा:

The post नाशिक : आधारतीर्थमधील चिमुकल्याच्या खुनाचा सावधगिरीने तपास appeared first on पुढारी.

Exit mobile version