Site icon

नाशिक : आधार लिंकिंगसाठी गाठा पोस्टमास्तरांना

नाशिक (मालेगाव) : पुढारी वृत्तसेवा
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थींना त्यांचे बँक खाते आधार क्रमांकाशी जोडण्याची सुविधा त्यांच्या गावातील पोस्ट मास्टर यांच्यामार्फत उपलब्ध करण्यात आली आहे. यासाठी आधारकार्ड, मोबाइल क्रमांक या कागदपत्रांचे आधारे आपल्या गावातील पोस्ट विभागाचे कर्मचारी यांच्यामार्फत इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत (आयपीपीबी)मध्ये खाते उघडावे. ही पद्धत कोणत्याही अतिरिक्त कागदपत्रांशिवाय करता येणार असल्याने अत्यंत सोपी व सुलभ असल्याची माहिती तहसीलदार नितीनकुमार देवरे यांनी दिली आहे.

या योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबास 2 हजार रुपये प्रती हप्ता याप्रमाणे 6 हजार रुपये दरवर्षी लाभ देण्यात येतो. योजनेच्या 14 व्या हप्त्याचा लाभ मे किंवा जून 2023 मध्ये जमा होणार आहे. केंद्र सरकारने हा लाभ मिळण्यासाठी लाभार्थ्यांना त्यांचे बँक खाते आधार क्रमांकास जोडणे बंधनकारक केले आहे. राज्यात सद्यस्थितीत 12.91 लाभ लाभार्थ्यांचे बँक खाते त्यांच्या आधार क्रमांकास जोडलेले नाहीत. त्यामुळे या लाभार्थ्यांच्या खात्यात 14 व्या हप्त्याचा लाभ जमा होणार नाही. त्यातही ग्रामीण भागातील लाभार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी आता बँक खाते आधार क्रमांकाशी जोडण्याची सुविधा गावातील पोस्टमास्टर यांच्यामार्फत उपलब्ध असल्याचे तहसीलदार देवरे यांनी नमूद केले आहे. पी. एम. किसान योजनेतील प्रलंबित लाभार्थ्यांची बँक खाते ‘आयपीपीबी’मध्ये उघडून ती आधार क्रमांकास जोडण्यासाठी राज्याच्या आयपीपीबी कार्यालयास गावनिहाय याद्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्याप्रमाणे गावातील पोस्टमास्टर या लाभार्थींना संपर्क करून ‘आयपीपीबी’मध्ये बँक खाते सुरू करतील. योजनेच्या 14 व्या हप्त्याच्या लाभासाठी आधार संलग्न बँक खाते अनिवार्य केलेले असल्याने आयपीपीबीमार्फत 1 ते 15 मे 2023 या कालावधीत यासाठी गावपातळीवर सर्वत्र मोहीम राबविण्यात येत आहे. आयपीपीबीमार्फत आयोजित या मोहिमेमध्ये सर्व प्रलंबित लाभार्थ्यांनी त्यांचे बँक खाते उघडावे, असे आवाहनही देवरे यांनी केले आहे.

दलालांपासून सावध
नवीन शिधापत्रिका तयार करणे, किंवा त्यात बदल करणे, स्वस्त धान्य दुकान बदली, नवीन नावे समाविष्ट करणे अथवा कमी करणे आदी कामे करण्यासाठी अर्जदारांनी स्वत: धान्य वितरण कार्यालयात यावे. कोणत्याही दलालाचा सहारा घेऊ नये, असे आवाहन धान्य वितरण अधिकारी दत्तात्रय शेजवळ यांनी केले आहे. कॅम्प, संगमेश्वर भागात माजी नगरसेवकांमध्ये शिधापत्रिकेसंदर्भात वादविवाद होत असून, त्या संदर्भात बॅनरबाजी होत आहे. जनतेने प्रलोभनांना बळी पडून पैशांची मागणी पूर्ण करू नये, असे आवाहन उपविभागीय अधिकारी विजयानंद शर्मा यांनी केले आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : आधार लिंकिंगसाठी गाठा पोस्टमास्तरांना appeared first on पुढारी.

Exit mobile version