नाशिक : आपण तरी तीन वर्षे कार्यकाळ पूर्ण करा!, एका दाम्पत्याच्या तोंडून नाशिककरांच्या भावना

नाशिक मनपा आयुक्त पुलकुंडवार,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
गेल्या चार ते पाच महिन्यांतच नाशिक महापालिकेने तीन आयुक्त पाहिले. तत्कालीन आयुक्त कैलास जाधव यांची उचलबांगडी होऊन रमेश पवार यांची नियुक्ती झाली. त्यांना चार महिने पूर्ण होत नाही तोच डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांची सध्या नियुक्ती झाली आहे. हाच धागा पकडत तुम्ही तरी तीन वर्षे आयुक्त या पदावर काम कराल, अशी अपेक्षा इंदिरानगर येथील एका दाम्पत्याने मनपा आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांच्याकडे व्यक्त करत जणू नाशिककरांचीच भावना मांडली.

महापालिकेची स्थापना झाल्यापासून आतापर्यंत केवळ विलास ठाकूर वगळता एकाही आयुक्ताला तीन वर्षांचा आपला सेवाकाळ नाशिक मनपाकरिता पूर्ण केला नाही की तशी संधीही मिळाली नाही. महापालिकेत लोकप्रतिनिधी आणि प्रशासन अशी दोन चाके असतात. या दोन चाकांवरच महापालिकेच्या माध्यमातून शहर विकासाचा गाडा हाकला जातो. त्यामुळे आयुक्त या पदाला महापालिकेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे स्थान असून, आयुक्त त्यांच्या संकल्पनेच्या अनुषंगाने शहर विकासाचे ध्येय साध्य करत असतात. बहुतांश आयुक्तांनी महापालिकेत दीड ते दोन वर्षे असाच कार्यकाळ केला आहे. कधी राजकीय, तर कधी विनंती अशा प्रकारच्या अधिकार्‍यांच्या बदल्या होत असतात. सध्या महापालिकेचे नूतन आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार विविध ठिकाणांना भेटी देऊन पाहणी करत आहेत. त्यापैकीच दादासाहेब फाळके स्मारकाला शुक्रवारी (दि. 5) त्यांनी भेट दिली.

यावेळी इंदिरानगर येथील मानकर दाम्पत्याशी त्यांनी संवाद साधत तब्येतीची विचारपूस केली. यानंतर त्यांनी मानकर यांच्याकडे शहर विकासासंदर्भात सल्ला विचारला असता मानकर दाम्पत्याने तीन वर्षे पदाचा कार्यकाळ पूर्ण करा, असे सांगत अप्रत्यक्षपणे आयुक्तांच्या कमी कार्यकाळाच्या भूमिकेबाबतच प्रश्न उपस्थित केला. मनपा आयुक्तांची बदली हा प्रशासकीय विषय असला तरी कमी कालावधी मिळणे ही बाब काही लपून राहिलेली नाही.

नागरिकांशी संवाद साधणार
आयुक्तांकडून शहरात विविध विकासकामे तसेच प्रकल्पांना भेटी देऊन पाहणी केली जात आहे. याच पाहणी दौर्‍याच्या निमित्त आयुक्त शहरातील नागरिकांशी संवाद साधून शहर विकासाच्या दृष्टीने येणार्‍या सूचनांचे स्वागत करणार आहेत. सध्या पावसामुळे शहरातील अनेक रस्त्यांची चाळण झाली आहे. मोठमोठ्या खड्ड्यांमुळे नागरिक त्रासले असून, तातडीने खड्डे दुरुस्तीचे आदेश आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांनी दिले आहेत.

हेही वाचा :

The post नाशिक : आपण तरी तीन वर्षे कार्यकाळ पूर्ण करा!, एका दाम्पत्याच्या तोंडून नाशिककरांच्या भावना appeared first on पुढारी.