नाशिक : आमदार सुहास कांदेंकडून मोफत आरोग्य सुविधा

सुहास कांदे,www.pudhari.news

नाशिक (नांदगाव) : पुढारी वृत्तसेवा
नांदगावचे आमदार सुहास कांदे व अंजुम कांदे यांच्या स्वखर्चातून मतदारसंघातील नागरिकांना मोफत आरोग्य सुविधांबरोबरच सेतू सुविधा घरपोच पुरविण्याच्या सेवेचा प्रारंभ शनिवार (दि. 11) पासून आमोदे व बोराळे या गावांपासून करण्यात आला.

सुसज्ज अद्ययावत उपकरणांसह दोन गाड्यांचे युनिट, डॉक्टर, सिस्टर, मदतनीस, डोळ्यांचे डॉक्टर, सेतु कार्यालय प्रतिनिधी व स्टाफ सोबत सकाळी 9 ला दोन्ही गावांत दाखल होत आरोग्यविषयक सुविधा पुरविण्यास सुरुवात करण्यात आली. ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने प्रतिसाद देत या सुविधांचा लाभ घेण्यासाठी गर्दी केली होती. नेत्रतपासणीनंतर गरजू रुग्णांना तत्काळ चष्मावाटप करण्यात आले. तसेच विविध प्रकारच्या शासकीय दाखल्यांचीही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. या सेवेबद्दल नागरिकांनी आमदार सुहास कांदे यांच्या या कामाचे कौतुक केले. डॉ. संकेत मार्कंड, डॉ. कीर्ती आहेर, डॉ. आशा जगताप, डॉ. राहुल पाटील आदींनी रुग्णांची तपासणी केली. यावेळी आमोदेच्या सरपंच वैशाली पगार, विठ्ठल पगार, उपसरपंच भूषण पगार, बोराळेच्या सरपंच अश्विनी पवार, राजेंद्र पवार, सर्व ग्रामपंचायत सदस्य, शिवसेना जिल्हाप्रमुख किरण देवरे, मजूर फेडरेशनचे चेअरमन प्रमोद भाबड, प्रकाश शिंदे, महेंद्र आहेर, सतीश बोरसे, गणेश खैरनार, भरत पारख आदींसह ज्येष्ठ ग्रामस्थ, महिला वर्ग व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तालुक्यातला प्रत्येक नागरिक हा माझ्या कुटुंबातला सदस्य आहे. त्याच्या आरोग्याची काळजी घेणे ही जबाबदारी माझी असल्याने ते माझे कर्तव्य मी पार पाडतोय. यात मला कुठलाही राजकीय स्वार्थ साधायचा नाही. – सुहास कांदे, आमदार.

हेही वाचा:

The post नाशिक : आमदार सुहास कांदेंकडून मोफत आरोग्य सुविधा appeared first on पुढारी.