नाशिक : ‘आरटीई’च्या ३८,३७१ जागा रिक्त; प्रतिक्षा यादीतील विद्यार्थ्यांना संधी मिळणार ?

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
राज्यातील शिक्षणाचा हक्‍क कायदा अर्थात ‘आरटीई’ प्रवेशप्रक्रिया अत्यंत संथगतीने सुरू आहे. सोडतीतीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेश निश्चितीसाठी तिसऱ्यांदा मुदत देऊनही पालकांनी पाठ फिरविल्याचे चित्र आहे.

सोडतीच्या प्रवेशाची मुदत साेमवारी (दि.२२) संपली असून, राज्यात ‘आरटीई’ प्रवेशाच्या ३८ हजार ३७१ जागा अद्यापही रिक्त आहेत. ६३ हजार ४८१ जागांवर पालकांनी प्रवेश निश्चित केले आहे. त्यामुळे प्रतिक्षा यादीच्या प्रवेश प्रक्रियेकडे पालकांचे लक्ष लागले आहे. सन २०२३०२४ या शैक्षणिक वर्षासाठी आरटीईअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना खासगी शाळांमध्ये २५ टक्‍के राखीव जागांसाठी प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येत आहे. राज्‍यातील ८,८२३ शाळांमध्ये आरटीईच्या १,०१,८४६ जागा उपलब्ध आहेत. त्यासाठी ३ लाख ६४ हजार ४१३ अर्ज प्राप्त झाले होते. लॉटरीत ९४,७०० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. मात्र, अद्यापही सुमारे ४० टक्के जागा रिक्त राहिल्याने शिक्षण विभागाची डोकेदुखी वाढली आहे. दरम्यान, लॉटरीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशप्रक्रियेसाठी सलग तीन वेळा प्राथमिक शिक्षण विभागाने मुदतवाढ दिली आहे. त्यानंतर प्रतीक्षा यादीची निवड प्रक्रिया राबविण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मात्र, पालकांचा अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने आरटीई प्रवेशांना विलंब होत आहे. नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होईपर्यंत आरटीई प्रवेशप्रक्रिया लांबण्याची चिन्हे आहेत.

राज्यातील प्रवेशाची स्थिती …
शाळा : ८,८२३
उपलब्ध जागा : १,०१,८४६
लॉटरी निवड : ९४,७००
प्रवेश निश्चित : ६३,४७५
रिक्त जागा : ३८,४७५

हेही वाचा:

The post नाशिक : 'आरटीई'च्या ३८,३७१ जागा रिक्त; प्रतिक्षा यादीतील विद्यार्थ्यांना संधी मिळणार ? appeared first on पुढारी.