नाशिक : आरटीई प्रवेशप्रक्रियेबाबत संभ्रम; राज्यभरात २३ हजार जागा रिक्तच

आरटीई www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी फेब्रुवारीपासून राज्य शासनाकडून वंचित व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी आरटीई (मोफत व सक्तीचा शिक्षण हक्क कायदा) अंतर्गत २५ टक्के मोफत ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येत आहे. आतापर्यंत एक नियमित आणि तीन प्रतीक्षा यादीतील फेऱ्या पार पडल्या आहेत. राज्यभरात सुमारे २३ हजार जागा अद्यापही रिक्त आहेत. त्यातच प्रवेश संपले की, पाचवी फेरी होणार याबाबत घोषणा न झाल्याने संपूर्ण प्रक्रियाच संभ्रमात सापडली आहे.

यंदा राज्‍यातील ९,०८६ शाळांमध्ये आरटीईच्या १,०१,९०६ जागा उपलब्ध असून, त्यासाठी २ लाख ८२ हजार ७८३ अर्ज प्राप्त झाले होते. लॉटरीत १ लाख १२ हजार ५६० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. आतापर्यंत ७८ हजार ८८९ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित केले आहेत. तर २३ हजार १७ जागा अद्यापही रिक्त आहेत. एकट्या नाशिक जिल्ह्यात ‘आरटीई’चे ३ हजार ९६४ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले असून, ९६३ विद्यार्थ्यांचे प्रवेश अद्यापही बाकी आहेत. प्रतीक्षा यादीतील चौथ्या फेरीसाठी विद्यार्थ्यांना ३ ऑगस्टपर्यंत प्रवेशाची मुदत देण्यात आली होती. या फेरीला पालकांचा अत्यल्प प्रतिसाद होता. त्यानंतर पंधरवडा उलटला तरी ‘आरटीई’च्या वेबसाइटवर या प्रवेशांबाबतची कोणतीही अद्ययावत माहिती उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. दरम्यान, आरटीई प्रवेशप्रक्रियेबाबत जिल्हा परिषद प्रक्रियेबद्दल शिक्षण विभागातील संबंधित अधिकाऱ्यांनाही कोणतीच माहिती नाही. प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांसाठी पाचवी फेरी राबविली जाणार की, प्रवेशप्रक्रियाच संपली याबाबत या अधिकाऱ्यांमध्येच संभ्रम आहे.

राज्यातील प्रवेशाची स्थिती

शाळा : ९,०८६

उपलब्ध जागा : १,०१,९०६

प्राप्त अर्ज : २,८२,७८३

प्रवेश निश्चित : ७८,८८९

रिक्त जागा : २३,०१७

हेही वाचा:

The post नाशिक : आरटीई प्रवेशप्रक्रियेबाबत संभ्रम; राज्यभरात २३ हजार जागा रिक्तच appeared first on पुढारी.