Site icon

नाशिक : ‘आरटीई’ प्रवेशाला सापडेना मुहूर्त; पालकांची चिंता वाढली

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
सन 2023-24 या शैक्षणिक वर्षासाठी जानेवारीपासून राज्य शासनाकडून वंचित व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी आरटीई (मोफत व सक्तीचा शिक्षण हक्क कायदा) अंतर्गत 25 टक्के मोफत ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येते. शाळा नोंदणीची प्रक्रिया पूर्ण होऊन 10 दिवसांचा कालावधी लोटला असून, अद्यापही आरटीईअंतर्गत मोफत प्रवेशप्रक्रियेच्या वेळापत्रकाची पालकांची प्रतीक्षा कायम आहे. फेब्रुवारी संपत आला तरी शिक्षण विभागाकडून याबाबत स्पष्टता नसल्याने पालकांची चिंता वाढली आहे.

सन 2023-24 या शैक्षणिक वर्षासाठी राज्यातून आठ हजार 827 शाळांनी नोंदणी केली असून, त्यानुसार एक लाख एक हजार 998 इतक्या जागांवर आरटीईअंतर्गत प्रवेश दिले जाणार आहेत. एकट्या नाशिक जिल्ह्यात 401 शाळांमध्ये 4,854 जागा उपलब्ध आहेत. यंदा प्रवेश क्षमतेचा टक्काही कमी झाला आहे. तर शाळांची संख्याही घटली आहे. त्यामुळे प्रवेशासाठी मोठी चुरस दिसून येणार आहे. दरम्यान, नव्या शैक्षणिक धोरणानुसार शाळा प्रवेशासाठी केंद्र सरकारने नवा नियम लागू केला. सहा वर्षे पूर्ण असलेल्या विद्यार्थ्यांनाच पहिलीमध्ये प्रवेश देण्याच्या सूचना देण्यात आल्या. नेमके वयाचे निकष कसे पाळायचे, यावर अधिकारी नियमावली तयार करत असल्याने आरटीई प्रवेशाला विलंब होत आहे. केंद्र सरकारच्या सूचनेनुसार प्रवेशस्तराबाबतच्या नियमावलीत सुधारणा, तांत्रिक बदल यानंतरच प्रत्यक्ष प्रवेशप्रक्रिया सुरू होईल, असे वरिष्ठ अधिकार्‍यांनी सांगितले. त्यामुळे प्रवेशाला मार्चमध्येच सुरुवात होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : ‘आरटीई’ प्रवेशाला सापडेना मुहूर्त; पालकांची चिंता वाढली appeared first on पुढारी.

Exit mobile version