नाशिक आरटीओला मिळाले आय.एस.ओ मानांकन; राबविलेल्‍या उपक्रमांची दखल

नाशिक : प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा आयएसओ ९००१-२०१५ सर्टिफिकेशनने गौरव करण्यात आला. कार्यालयातील डिजिटायझेशन व अन्‍य विविध उपक्रमांतून येणाऱ्या नागरिकांना सुविधा उपलब्‍ध झाली. याची दखल घेत हे मानांकन देण्यात आले.

इतक्‍या वाहनांचे अभिलेखे संगणकीकृत

प्रादेशिक परिवहन कार्यालयीन कामकाजाचे संगणकीकरण प्रक्रियेला १९९७ पासून वाहन नोंदणी आणि अनुज्ञप्तीच्या कामकाजाला टूल्‍स या ऑफलाइन प्रणालीद्वारे सुरवात झाली होती. २००७ पासून वाहनचालक अनुज्ञप्तीसाठी सारथी १.० प्रणाली, वाहन नोंदणीसाठी वाहन १.० या केंद्र सरकारद्वारे साकारलेल्‍या संगणकप्रणालीचा ऑफलाइन वापर सुरू होता. जानेवारी २०१७ पासून सारथी ४.० आणि वाहन ४.० ऑनलाइन प्रणालीचा वापर करताना, कार्यालयाचे संपूर्ण कामकाज ऑनलाइन पद्धतीने सुरू केले होते. 
आतापर्यंत एक लाख २० हजार ९९५ इतक्‍या अनुज्ञप्तीचे आणि एकूण १७ लाख ८४ हजार ७६४ इतक्‍या वाहनांचे अभिलेखे संगणकीकृत केले आहेत. सध्या कार्यालयातर्फे ऑनलाइन अपॉइंटमेंट सुविधा उपलब्‍ध आहे. शिकाऊ अनुज्ञप्तीसाठी संगणकप्रणालीद्वारे चाचणी घेण्यासही कार्यालयाने २००३ पासून सुरवात केली होती. 

पुढे या प्रणालीचा राज्‍यभरात अवलंब

यशस्‍वी वापरानंतर शासनाने राज्‍यभरात या प्रणालीद्वारे चाचणी घेण्यास सुरवात केली. या प्रणालीद्वारे आतापर्यंत एक लाख आठ हजार ६०४ चाचण्या घेण्यात आल्‍या आहेत. यापैकी ८९ हजार ३२९ (८२.२५ टक्‍के) अर्जदार उत्तीर्ण, तर ३३ हजार ६८५ (३१.०१) उमेदवार अनुत्तीर्ण झाले. 
शिबिर कार्यालयात शिकाऊ अनुज्ञप्तीसाठी टॅबद्वारे चाचणी घेण्यास राज्‍यात सर्वप्रथम नाशिक आरटीओ कार्यालयाने सुरवात केली. पुढे या प्रणालीचा राज्‍यभरात अवलंब झाला. दरम्‍यान, कार्यालयामार्फत ६१९ शिबिरांतून ५८ हजार ८०५ चाचण्या घेतल्‍या असून, ४५ हजार २७९ उमेदवार उत्तीर्ण, १३ हजार ५२६ उमेदवार अनुत्तीर्ण झाले. स्‍वयंचलित वाहन तपासणी केंद्राची उभारणी कार्यालयाच्‍या आवारात केली होती. ऑक्‍टोबर २०१५ पासून वाहन तपासणी करून योग्‍यता प्रमाणपत्र दिले जात आहे.

आयएसओ सर्टिफिकेशनविषयी 

क्‍वालिटी व्‍हेरिटस सर्टिफिकेशन लिमिटेडतर्फे आयएसओ सर्टिफिकेशन जारी केले आहे. याअंतर्गत ९ डिसेंबरला २०२१ व पुढील वर्षी २०२२ मध्ये ९ डिसेंबरला कामकाजाचा फेरआढावा घेतला जाणार आहे. या सर्टिफिकेशनची वैधता ९ डिसेंबर २०२३ ला संपुष्टात येईल. 

हेही वाचा > चोरट्यासोबत जेव्हा 'ती' महिलाही चालत्या रेल्वेतून पडली खाली; घटनेने प्रवाशांचा थरकाप

कार्यालयाचे शंभर टक्‍के डिजिटायझेशन झाले असून, अतापर्यंत अनुज्ञप्ती, वाहन नोंदणीसंदर्भात ४० लाखांहून अधिक डिजिटल नोंदणी उपलब्‍ध आहे. योग्‍यता प्रमाणपत्रासाठी राज्‍यातील एकमेव स्‍वयंचलित वाहन तपासणी केंद्र नाशिक कार्यालयात आहे. नाशिक फर्स्‍ट स्‍वयंसेवी संस्‍थेच्‍या सहकार्याने वाहतूक नियमांविषयी जनजागृती केली जात आहे. यापुढेही आणखी सुधारणा करायच्‍या आहेत. - भरत कळसकर, प्रादेशिक परिवहन अधिकारी

हेही वाचा > रुग्णवाहिकाचालकाने अ‍ॅम्ब्युलन्समध्येच साधली संधी; अपघातग्रस्त रुग्णासोबतच धक्कादायक प्रकार