नितीन गडकरी नाशिक,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण, आरोग्य आणि आर्थिक विकास होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले. ‘ब्लॉसम’ या संशोधन प्रकल्पाचा लाभ दुर्गम भागातील आदिवासी समाजाच्या आरोग्य समस्यांच्या पूर्तीसाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली शासनाचा आदिवासी विकास विभाग व कै. लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्था, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने दुर्गम भागातील लोकांकरिता असलेल्या आरोग्यविषयक ‘ब्लॉसम’ उपक्रमाच्या उद्घाटन समारंभाप्रसंगी ना. गडकरी बोलत होते. नागपूर येथे झालेल्या सोहळ्याप्रसंगी व्यासपीठावर विद्यापीठाच्या कुलगुरू लेफ्टनन्ट जनरल (नि.) डॉ. माधुरी कानिटकर, आदिवासी विभागाचे नागपूर विभागाचे अपर आयुक्त रवींद्र ठाकरे, गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, अरुण ललवाणी, सुधीर दिवे, डॉ. संजीव चौधरी, डॉ. अजित सावजी आदी उपस्थित होते.

ना. नितीन गडकरी म्हणाले की, विद्यापीठांनी शिक्षण आणि संशोधनासमवेत विद्यार्थ्यांसाठी रोजगार निर्माण होईल, असे उपक्रम राबविणे गरजेचे आहे. सामाजिक विकाससाठी शिक्षण, आरोग्य व रोजगार महत्त्वपूर्ण असून, त्यासाठी डिजिटल साधनांचा वापर करून सेवा दिली पाहिजे. ‘ब्लॉसम’ हा नावीन्यपूर्ण उपक्रम असून, त्याद्वारे दुर्गम भागातील लोकांना आरोग्यविषयक लाभ होईल. तसेच आधुनिक आरोग्य विद्याशाखांबरोबरच योगा, प्राणायाम यांचादेखील समावेश करावा. सिकलसेल, थॅलेसिमिया, कुपोषण आदी आरोग्यविषयक प्रश्न दुर्गम भागात मोठया प्रमाणात आढळतात. या दृष्टिकोनातूनही कार्य करण्याच्या सूचना गडकरी यांनी केल्या.
डॉ. माधुरी कानिटकर यांनी ‘ब्लॉसम’ उपक्रमांतर्गत नागपूर, चंद्रपूर व गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात विद्यार्थी स्वयंसेवक आरोग्यबाबत जागृती करणार आहे. जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रांतील मान्यवर, महाविद्यालयांचे अधिष्ठाता, प्राचार्य, शिक्षक व विद्यापीठातील अधिकारी उपस्थित होते.

रोजगाराभिमुख व्हावे : ना. गडकरी
केंद्र शासनाच्या नॅशनल एज्युकेशन पॉलिसीनुसार कौशल्य आधारित उपक्रम राबविणे गरजेचे आहे. दुर्गम भागात शिक्षण, आरोग्य व रोजगारासाठी विविध शासकीय योजनांचा उपयोग करत सेवाभावी संस्थांच्या सहकार्याने निःशुल्क सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. दुर्गम भागात कच्चा माल मोठ्या प्रमाणात उपलब्ध असून, त्यावर आधारित उद्योगांना चालना द्यावी, यासाठी विद्यापीठांनी रोजगाराभिमुख अभ्यासक्रम सुरू करावेत, असा सल्ला ना. नितीन गडकरी यांनी दिली.

हेही वाचा :

The post नाशिक : आरोग्य, शिक्षणातून आदिवासींचा सर्वांगीण विकास- ना. नितीन गडकरी appeared first on पुढारी.