नाशिक : आशा सेविकांनी आंदोलनस्थळी चूल मांडून शिजवली खिचडी

आशा सेविका,www.pudhari.news

चांदवड (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा
कोरोना काळात केलेल्या कामाचा थकीत असलेला प्रोत्साहन भत्ता मिळण्यासाठी आशा स्वयंसेविका व आशा सुपरवायझर (गटप्रवर्तक) यांच्या संघटनेने येथील पंचायत समिती कार्यालयाच्या इमारतीसमोर ठिय्या आंदोलन केले. यावेळी गटविकास अधिकारी महेश पाटील यांना निवेदन देण्यात आले.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने काढलेल्या जीआरची त्यावेळी चांदवड तालुक्यात तत्काळ अंमलबजावणी आशा स्वयंसेविका व आशा सुपरवायझर यांनी केली होती. आशा स्वयंसेविका व आशा सुपरवायझर यांनी स्वतःच्या कुटुंबाची आणि स्वतःच्या जिवाची पर्वा न करता जनतेचे प्राण वाचविण्यासाठी जनतेस घरोघरी जाऊन आरोग्यसेवा पुरविली होती. त्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने आशा स्वयंसेविका व आशा सुपरवायझर गटप्रवर्तक यांना एप्रिल 2020 ते कोरोना संपेपर्यंत दरमहा एक हजार रुपये देण्याबाबतचे परिपत्रक काढलेले आहे. मात्र, या अध्यादेशाची एप्रिल 2020 मध्ये फक्त एकदाच अंमलबजावणी करून ग्रामपंचायतीने एक हजार रुपये दिले होते. त्यानंतर ग्रामपंचायतींनी दर महिन्याला पैसे दिले नाही.

याविषयी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्याकडे तक्रार केली असता त्यांनी जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकार्‍यांना याबाबत पत्र काढले होते. तरीदेखील चांदवड तालुक्यामध्ये राज्य व जिल्हा परिषदेच्या पत्राची अंमलबजावणी झालेली नाही. चांदवड नगर परिषदेकडे थकीत असलेला कोरोना प्रोत्साहन भत्ता त्वरित मिळावा, आशा व गटप्रवर्तकांचे थकीत मानधन मिळावे, दिलेल्या मानधनाची तपशीलवार माहिती आशा गटप्रवर्तकांना देण्यात यावी आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. विजय दराडे, सुवर्णा मेतकर, सुनीता गांगुर्डे, शीला ठाकरे, संगीता जाधव, गीतांजली गांगुर्डे, सुषमा आघाव यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. आंदोलनात शोभा केदारे, सविता व्यवहारे, अंजली दिवटे, अमृता गांगुर्डे, आरती तांदळे, फर्जद शेख आदी सहभागी झाल्या होत्या.

हेही वाचा :

The post नाशिक : आशा सेविकांनी आंदोलनस्थळी चूल मांडून शिजवली खिचडी appeared first on पुढारी.