नाशिक : आषाढी एकादशीला यंदा लालपरीच्या उत्पन्नात घट, ‘यामुळे’ बसला फटका

आषाढी एकादशी लालपरी,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
दरवर्षी पंढरपूरच्या आषाढी यात्रेनिमित्त महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या तिजोरीत मोठी भर पडत असते. मात्र, यंदा ऐन यात्रोत्सवाच्या काळात वरुणराजाने राज्यात सर्वदूर हजेरी लावल्याने वारकर्‍यांनी एसटीकडे पाठ फिरविली. त्यातच अनेक मार्गांवरील प्रवासी वाहतूक बंद करण्यात आल्याचा फटका एसटी महामंडळाला बसला. त्यामुळे सन 2019 च्या तुलनेत लालपरीच्या आषाढी यात्रा उत्पन्नात मोठी घट झाली आहे.

‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ असे ब—ीदवाक्य असलेल्या एसटी महामंडळाने यंदाही वारकर्‍यांसाठी जादा बसेस सोडण्याचे नियोजन करण्यात आले होेते. पंढरपूर यात्रेसाठी नाशिक विभागातून 227 बसेस सोडण्यात आल्या होत्या. या बसेसनी 912 फेर्‍या पूर्ण करीत, 29 लाख 55 हजार 542 किलोमीटरचे अंतर कापले होते. एसटी महामंडळाला प्रतिकिलोमीटर 32 रुपये 59 पैसे उत्पन्न मिळाले. संपूर्ण यात्रेत 37 हजार 96 प्रौढ, 13 हजार 397 ज्येष्ठ नागरिक, तर 3 हजार 641 लहान प्रवाशांची वाहतूक करण्यात आली. त्यातून एसटीला 94 लाख 85 हजार 871 उत्पन्न मिळाले.

दरम्यान, आषाढी यात्रेच्या कार्यकाळात पावसाने दमदार हजेरी लावल्याने खबरदारीचे उपाय म्हणून स्थानिक प्रशासनाकडून एसटीऐवजी रेल्वे आणि इतर पर्यायांना प्राधान्य देण्यात आले होते. त्यामुळे परजिल्ह्यातून आलेल्या बसेस पंढरपूर आगारात उभ्या होत्या. लालपरी प्रत्यक्ष रस्त्यावर धावली नसल्याने उत्पन्नाला मुकावे लागल्याचे एसटीच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी सांगितले.

50,00,000/- रुपयांच्या उत्पन्नावर पाणी

सन 2019 च्या आषाढी एकादशी यात्रेच्या माध्यमातून एसटी महामंडळाच्या नाशिक विभागाला तब्बल एक कोटी 51 लाख 67 हजार 963 रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. मागील दोन वर्षे कोरोनामुळे यात्रा होऊ शकली नसल्याने आधीच तोट्यात असलेल्या एसटी महामंडळाला आषाढी यात्रेच्या हक्काच्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागले होते. यंदा 94 लाख 85 हजार 871 रुपयांचे उत्पन्न मिळाले. अतिवृष्टीमुळे एसटी महामंडळाच्या 50 लाखांच्या हक्काच्या उत्पन्नावर पाणी फेरले

हेही वाचा :

The post नाशिक : आषाढी एकादशीला यंदा लालपरीच्या उत्पन्नात घट, 'यामुळे' बसला फटका appeared first on पुढारी.