नाशिक : इंदिरानगरला आर्थिक वादातून गोळीबार

गोळीबार ,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

शहरासह उपनगरांमध्ये गुन्हेवारी वाढत असून, आर्थिक वादातून गोळीबार झाल्याची घटना इंदिरानगर परिसरात घडली. भरवस्तीत गोळीबाराची खळबळजनक घटना घडल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तर वारंवार शहरात शस्त्रांचा वापर होत असल्याने पोलिसांपुढील आव्हानेही वाढल्याचे बोलले जात आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अविनाश विक्रम टिळे (२७, रा. आशाभक्ती रो हाऊस, धात्रक फाटा, पंचवटी) व त्याचे मित्र विनोद गोसावी, यश शिंदे, भूषण देशमुख व युवराज सोनवणे हे मुख्य संशयित सुनिल चोरमारे (३५, रा. राणेनगर) यांची वापरण्यासाठी घेतलेली चारचाकी (एमएच ०१, बीजी ५८८१) परत देण्यासाठी सी. के. मोटार गॅरेजसमाेर, इंदिरानगर बोगद्याजवळ गेले होते. संशयित चोरमारे यांनी टिळे व त्यांच्या मित्रांना बघून गावठी बंदुकीतून हवेत गोळीबार केला. तसेच टिळे यांना शिवीगाळ करत त्यांच्यावर संशयित चोरमारे यांनी बंदूक रोखून गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने बंदुकीतून गोळी न सुटल्याने टिळे बचावले. भेदरलेल्या टिळे यांनी मित्रांसह मुंबईनाका पोलिसांत धाव घेत फिर्याद दिली. टिळे यांच्या फिर्यादीवरून संशयित चाेरमारे, जग्गू सांगळे, राज जोशी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून तिघा संशयितांचा शोध सुरू असून, अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक मन्सुरी करत आहे. दरम्यान, आर्थिक वादातून गोळीबार झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : इंदिरानगरला आर्थिक वादातून गोळीबार appeared first on पुढारी.