Site icon

नाशिक : इंधन महागल्याने होळीवर महागाईची संक्रांत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
हिंदू धर्मात कोणतेही धार्मिक कार्य अथवा होमहवन करण्यासाठी गायीच्या शेणाची गोवरी जाळल्याने होणारे फायदे सांगितलेले आहेत. या परंपरेतच होलिकोत्सवासाठी शेणाच्या गोवर्‍या वापरण्याची परंपरा आहे. त्यासाठी नाशिक शहराचा विचार केला तरी किमान 25 लाख रुपयांची उलाढाल त्यात होते. शहरात गायींचे प्रमाण कमी झाल्याने ग्रामीण भागातून गोवर्‍या आणल्या जातात. गोदाकाठी नेहमीप्रमाणे यंदाही गोवर्‍या विक्रीसाठी दाखल झाल्या असून, इंधनाची किंमत वाढल्याने त्याचा अप्रत्यक्ष परिणाम गोवर्‍यांवर झाला आहे. मोठी गोवरी 20 रुपयांना एक याप्रमाणे विकली जात असल्याने गोवर्‍यांची खरेदी करणे मंडळांसाठी अवघड झाले आहे.

होळीसाठी गोदाकाठी गोवर्‍या विक्रीला येण्याची परंपर जुनी आहे. काही काळापूर्वी या ठिकाणी लाकडाच्या वखारी आणि गोवर्‍यांचे भंडार 12 महिने उपलब्ध असे. मात्र, कालांतराने वखारी बंद झाल्या तर गोठे बंद झाल्याने गोवर्‍याही मिळेनाशा झाल्या. शहरात गायी पाळण्यासाठी पुरेशी जागाच उपलब्ध नसल्याने घराघरांतून पाळल्या जाणार्‍या गायींना पांजरापोळची वाट दाखवली गेली. पेठ, हरसूलसारख्या ग्रामीण भागातील आदिवासी कुटुंब रोजगाराचे माध्यम म्हणून गोवर्‍या विक्रीकडे बघतात. त्यामुळे वर्षभर रानगोवर्‍या जमा करणे अथवा शेणाच्या गोवर्‍या थापून त्याची साठवणूक करणे हा त्यांचा व्यवसाय झाला आहे. त्याच गोवर्‍या होळीसाठी नाशकात विकायला आणल्या जातात. कोरोना काळात त्यांना याची विक्री करता आली नाही, यंदा त्याची विक्री करण्यासाठी ते शहरात दाखल झाले असले तरी गोवर्‍यांची वाहतूक करण्यासाठी वाहतूक भाड्याने त्यांना गोवर्‍यांची किंमत वाढवावी लागली आहे. काही वर्षांपूर्वी 5 रुपयांना एक याप्रमाणे मिळणारी गोवरी आज थेट 20 रुपयांना भिडली आहे. तर लाकडांची किंमतही थेट 25 रुपये किलो झाली आहे. त्यामुळे यंदा होळीवर महागाईचे सावट स्पष्ट जाणवते आहे.

गोवर्‍या का जाळतात?
गाईच्या शेणाच्या गोवर्‍या जाळल्यावर जो धूर निघतो तो अत्यंत पवित्र मानला जातो. या धुराने नकारात्मक शक्ती निघून जाते आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो. हवनात गाईच्या शेणाच्या गोवर्‍या किंवा शेणाचे गोळे जाळल्यास पूजेचे पूर्ण फळ मिळते आणि घरात शांती राहते. तसेच शेणाच्या गोवर्‍या जाळल्याने वातावरणात ऑक्सिजननिर्मिती होते, त्यामुळे वातावरणशुद्धी होत असल्याने सहसा होलिकोत्सवामध्ये गोवर्‍याच वापरल्या जातात.

त्याचप्रमाणे होळी आणि गुढीपाडव्यासाठी लागणारे साखरेचे हार-कडे बाजारात दाखल झाले आहेत. साखरेची किंमत तसेच कच्चा माल आणि वाहतुकीचा खर्च याचा फटका बसल्याने हार-कड्यांच्या किमतीत वाढ झाली आहे. एका कड्याची सर्वांत कमी किंमत 10 रुपये, तर किमान 20 रुपयांना हार मिळतो आहे. साखरेचे नारळ थेट 60 रुपये नगावर पोहोचले आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : इंधन महागल्याने होळीवर महागाईची संक्रांत appeared first on पुढारी.

Exit mobile version