
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने इगतपुरीतील पाडळी शिवारातून 75 लाख रुपयांचे अवैध विदेशी मद्य व ट्रक असा एकूण 90 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत ट्रकचालकास अटक करण्यात आली आहे.
सचिन बाळासाहेब भोसले (29, रा. पोखरापूर ता. मोहोळ जि. सोलापूर) असे संशयित चालकाचे नाव आहे. भरारीपथक एकचे निरीक्षक जयराम जाखेरे यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने रविवारी (दि. 4) गस्त घालून इगतपुरीतील पाडळी शिवारातील हॉटेल पवनसमोर वाहनांची तपासणी केली. तेव्हा एमएच-40 वाय-4467 क्रमांकाचा बाराचाकी ट्रक अडविण्यात आला. ट्रकची तपासणी केली असता, त्यात केवळ गोवा राज्यात विक्रीसाठी परवानगी असलेला विदेशी मद्यसाठा आढळून आला.
त्यामुळे पथकाने ट्रकसह मद्यसाठा ताब्यात घेतला. त्यात विदेशी मद्याच्या 15 हजार 322 बाटल्या आढळून आल्या आहेत. कारवाईत मद्य व बाराचाकी ट्रक असा 89 लाख 93 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. नाशिकचे विभागीय उपआयुक्त अर्जुन ओहोळ, जिल्हा अधीक्षक शशिकांत गर्जे व उपअधीक्षक हर्षवर्धन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक जयराम जाखेरे, दुय्यम निरीक्षक पी. बी. ठाकूर, राहुल राऊळ, रोहित केरीपाळे, एम. आर. तेलंगे, जवान सुनील दिघोळे, विजेंद्र चव्हाण, धनराज पवार, एम. पी. भोये, राहुल पवार, गोकुळ परदेशी, किरण कदम यांच्या पथकाने ही कारवाई केली.
हेही वाचा :
- कोल्हापूर : एक ऑक्टोबरपासून हंगाम सुरू करण्याच्या हालचाली
- कोल्हापूर : मांडरे गोळीबारातील दोघा फरारींना अटक
- जुन्नर, खेड, दौंड, बारामती, शिरूर, इंदापूरला सर्वाधिक ई-केवायसी प्रलंबित
The post नाशिक : इगतपुरीत 75 लाखांचा अवैध मद्यसाठा जप्त appeared first on पुढारी.