नाशिक : इतिहास घडवण्यासाठी इतिहासाचा मागोवा गरजेचा : ना. डॉ. भारती पवार

aarogya vidyapitha www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
इतिहास घडविण्यासाठी इतिहासाचा मागोवा घेणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य व कुटुुंबकल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केले.

आरोग्य विज्ञान विद्यापीठ आणि राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी (दि. 16) ‘स्वातंत्र्यसंग्रामात जनजाती नायकांचे योगदान’ या विषयावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यापीठात झालेल्या या कार्यक्रमात ना. डॉ. पवार बोलत होत्या. याप्रसंगी विद्यापीठाच्या कुलगुरू लेफ्टनंट जनरल (निवृत्त) डॉ. माधुरी कानिटकर, जनजाती कल्याण आश्रम पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ. भरत केळकर व राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाचे सदस्य मिलिंद थत्ते, प्रति-कुलगुरू डॉ. मिलिंद निकुंभ, कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. ना. डॉ. भारती पवार म्हणाल्या की, नव्या पिढीवर देशाचे भविष्य आहे. त्यांनी इतिहासाची माहिती घेतली पाहिजे, तरच ते इतिहास घडवू शकतील. जनजाती समाजाने पर्यावरण रक्षणासाठी भरीव कार्य केले आहे. जल, जंगल व जमीन यांचे रक्षण ते आजही करतात. वैयक्तिक स्वार्थाचा विचार न करता, समाज व राष्ट्रासाठी कार्य करण्याची नि:स्वार्थ भावना त्यांच्यात असते. हा आदर्श आपणही घ्यावा जेणेकरून पुढील पिढीला ते प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास ना. डॉ. पवार यांनी व्यक्त केला. डॉ. कानिटकर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, राष्ट्रभक्ती व समाजात संघर्षमय चळवळ करताना अनेक जनजाती नायकांनी बलिदान दिले आहे, त्यांचे कार्य गौरवास्पद आहे. विद्यार्थ्यांनी जनजाती नायकांच्या माहितीतून आदर्श घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. डॉ. भरत केळकर यांनी मनोगतामध्ये, जनजाती नायकांचा इतिहास समाजाला मुख्यतः तरुण पिढीला माहिती व्हावा. यातून तरुणांनी आदर्श घ्यावेत, असे आवाहन केले. कार्यक्रमस्थळी जनजाती नायकांचे छायाचित्र व थोडक्यात माहितीचे प्रदर्शन भरविण्यात आले. बाळू घटे यांनी प्रास्ताविक, विद्यापीठ जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्निल तोरणे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. मिलिंद निकुंभ यांनी आभार मानले.

हेही वाचा:

The post नाशिक : इतिहास घडवण्यासाठी इतिहासाचा मागोवा गरजेचा : ना. डॉ. भारती पवार appeared first on पुढारी.