
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
केंद्र शासनाच्या ‘फेम-२’ योजनेअंतर्गत ५० इलेक्ट्रिक बस खरेदीसाठी प्रति बसमागे ५५ लाख रुपयांचे अनुदान मिळत नसल्याचे बघून महापालिकेच्या पर्यावरण विभागाने आता नॅशनल एअर क्लिन मिशन योजनअंतर्गत २५ बसेससाठी दरवर्षी मिळणाऱ्या २० काेटी निधीतून प्रतिबस साधारण ३० लाख रुपयांचे अनुदान मिळविण्यासाठी धडपड सुरू केली आहे.
एन कॅप योजनेत हवा प्रदूषण कमी करण्यासाठी विविध याेजनांकरिता निधी वापरण्याची अट असून, ही अट बदलून सर्व निधी केवळ इलेक्ट्रिक बसेस चालवण्यासाठीच उपलब्ध व्हावा यादृष्टीने पालिकेचा यांत्रिकी व पर्यावरण विभाग हा केंद्रीय पर्यावरण विभागाकडे प्रस्ताव पाठवणार आहे. ८ जुलै २०२१ पासून नाशिक महानगर परिवहन महामंडळाच्या ‘सिटीलिंक-कनेक्टिक नाशिक’च्या माध्यमातून पालिकेने २०० सीएनजी व ५० डिझेल बसेस सुरू केल्या. मात्र, या बसेस टप्प्याटप्प्याने सुरू झाल्या. दरम्यान, याव्यतिरिक्त पर्यावरणपूरक बससेवेकरिता ५० इलेक्ट्रिक बसेस घेण्याचा प्रस्ताव महापालिकेने केंद्राच्या ‘फेम-२’ योजनेअंतर्गत केंद्राच्या अवजड उद्योग मंत्रालयाला सादर केला होता. राज्याचे तत्कालीन विरोधी पक्षनेते तथा विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रस्तावासाठी केंद्राकडे पाठपुरावा करू, असे बससेवा उद्घाटनाच्या वेळीच स्पष्ट केले हाेते. प्रतिबसमागे ५५ लाख रुपये अनुदान अपेक्षित हाेते. मात्र, फेम -२ याेजनेच्या सूचनेनुसार पालिकेला आपल्या निविदेतील अटी-शर्ती बसवणे शक्य झाले नाही. फेम-२ योजनेअंतगर्त इलेक्ट्रिक बसेस खरेदीचा प्रस्ताव अडचणीत असल्याचे बघून आयुक्त डाॅ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी आता एन कॅप याेजनेनुसार बसेससाठी अनुदान मिळवता येईल का यादृष्टीने चाचपणी करण्याचे आदेश दिले आहेत. एन कॅप याेजनेंतर्गत वर्षाला २० काेटी रुपयांचा निधी पालिकेला हवा प्रदूषण कमी करण्यासाठी मिळणार आहे. इलेक्ट्रिक बसेस खरेदी झाल्या तर हवा प्रदूषण कमी हाेणार असल्याचा संदर्भ देत आता, ५० ऐवजी २५ इलेक्ट्रिक बसेससाठी निधी मिळवता येईल का यादृष्टीने प्रस्ताव तयार केला जात आहे. एका इलेक्ट्रिक बसची किंमत साधारण एक ते दीड काेटी रुपयांची आहे. बसेसच्या किमतीच्या २५ ते ३० टक्के निधी अनुदानास्वरूपात देता येऊ शकेल हे लक्षात घेत, २५ बसेससाठी निधी मिळवता येईल का यासंदर्भात केंद्रांच्या पर्यावरण विभागाकडे प्रस्ताव पाठवला जाणार आहे.
४० कोटींचे अनुदान प्राप्त
केंद्र सरकारने २०२४ पर्यंत देशभरातील १३२ शहरांमधील प्रदूषण पातळी २० ते ३० टक्के कमी करण्यासाठी राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम अर्थात एन-कॅप योजना सुरू केली आहे. या योजनेत नाशिकचाही समावेश करण्यात आला असून, वायू प्रदूषण रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांकरिता महापालिकेला केंद्राकडून ४० कोटींचे अनुदानदेखील प्राप्त झाले आहे. या अनुदानातून विद्युत शवदाहिनी, यांत्रिकी झाडू खरेदीबरोबरच ५० इलेक्ट्रिक बसेस खरेदीकरिता अर्थसहाय्य मिळविण्यासाठीदेखील महापालिकेने पर्यावरण विभागामार्फत केंद्राकडे प्रस्ताव सादर करण्याची तयारी केली आहे.
हवा प्रदूषण कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक बसची मदत हाेणार आहे. ही बाब लक्षात घेत, एन कॅप याेजनेंतर्गत संपूर्ण निधी वापराची परवानगी मागितली जाणार आहे. त्यासाठी पालिकेच्या पर्यावरण विभागाकडून केंद्रीय पर्यावरण विभागाकडे प्रस्ताव पाठवला जाईल. – बाजीराव माळी, कार्यकारी अभियंता.
हेही वाचा:
- आरोप करून राजकीय लाभ घेण्याचा प्रयत्न : एकनाथ शिंदे
- सांडपाण्यात उभे राहून स्वच्छतेचे काम; बिबवेवाडीत कामगारांचे आरोग्य धोक्यात
- राज्यस्तरीय साहित्य संमेलन : महिलांच्या हातात लेखणी येण्यासाठी अनेक पिढ्या झिजल्या
The post नाशिक : इलेक्ट्रिक बसच्या अनुदानासाठी महापालिकेची धडपड appeared first on पुढारी.