नाशिक : उंटांचा उद्यापासून मरुभूमीकडे प्रवास

उंट,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

राजस्थानमधील जैसलमेर येथून उंटांचा सांभाळ करणारे रायका मंगळवारी (दि. १६) नाशिकमध्ये दाखल होणार आहेत. त्यांच्यासमवेत बुधवार (दि. १७) पासून उंटांचा प्रवास मरुभूमीकडे सुरू हाेणार आहे. तत्पूर्वी पशुसंवर्धन विभागाने १४६ उंटांचे लसीकरण व टॅगिंगचे काम पूर्ण केले आहे. आतापर्यंत दुर्दैवाने नऊ उंटांचा मृत्यू झाला असून, मालेगावी एका उंटाचा जन्म झाला.

पंधरवड्यापूर्वी सटाणा, दिंडोरीमार्गे १११ उंट नाशिकमध्ये दाखल झाले होते. मालेगावला ४२ उंट स्थिरावले होते. जिल्ह्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात पहिल्यांदाच उंट दाखल झाल्याने तो चर्चेचा विषय ठरला होता. पर्यावरणप्रेमींनी या प्रकरणात आवाज उठविल्याने हा विषय थेट राज्य स्तरावर पोहोचला होता. दरम्यानच्या काळात नाशिकमधील उंट हे पांजरापोळच्या चुंचाळे येथील जागेत हलविण्यात आले हाेते. तसेच मालेगावच्या उंटांचे तेथील गो-शाळेत पुनर्वसन करण्यात आले. पण या सर्व प्रकारांत उंटांचे मूळ मालक कोण? ते कशासाठी एवढ्या प्रमाणात नाशिकम‌ध्ये दाखल झाले होते, याचा कोणताच थांगपत्ता न लागल्याने हे उंट पुन्हा राजस्थानला पाठविण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे.

जिल्ह्यात दाखल झालेल्या सर्व उंटांचे लसीकरण पशुसंवर्धन विभागाकडून करतानाच त्यांचे टॅगिंग करण्यात आले. तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीचे पत्र देऊन श्रीमद् राजचंद्र मिशन संस्थेचे पदाधिकारी हे उंट राजस्थानच्या सिंहोरी येथील महावीर कॅमल सेन्चुरीमध्ये पुनर्वसनासाठी नेणार आहेत. बुधवार (दि. १७) पासून या उंटांचा राजस्थानकडचा प्रवास सुरू हाेणार असून, सुमारे दीड महिन्यात ते सिंहोरीपर्यंत पोहोचतील, अशी अपेक्षा आहे.

असा होणार प्रवास

उंटांचा नाशिक ते सिरोही (राजस्थान) अशी घरवापसी होणार आहे. त्यामध्ये नाशिक – वणी – धरमपूर, बार्डोली, कर्जन, बडोदा, अहमदाबाद (माउंट अबूरोड) महेताना, पालनपूर, अंबाजीमार्गे सिरोही जिल्ह्यातील कॅमल सेन्चुरीपर्यंत हे सर्व उंट प्रवास पूर्ण करतील. उंटांचा पहिला मुक्काम वणी येथे होईल. त्यानंतर धरमपूरच्या श्रीमद् राजचंद्र मिशन संस्थेत जीवमैत्रीधाममध्ये होईल. तेथे पशुवैद्यकांकडून उंटांची आरोग्य तपासणी करून तेथून पुढे बार्डोलीमार्गे प्रवास सुरू होईल. या प्रवासात पोलिस संरक्षणात महाराष्ट्राच्या सीमेपर्यंत उंटांना नेले जाणार आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : उंटांचा उद्यापासून मरुभूमीकडे प्रवास appeared first on पुढारी.